डोंबिवली ( शंकर जाधव ) : नागपंचमी निमित्ताने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्त नगर आणि स्वामी विवेकानंद शाळा अरुणोदय येथे डॉ.निलेश भणगे आणि ऋषिकेश सुरसे 'सर्प आणि त्यांचे महत्त्व' विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.स्वामी विवेकानंद दत्तनगर शाखेच्या मुख्याध्यापिका सुलभा बोंडे आणि शिक्षिका शशिकला कांबळे ह्यांनी सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला होता.दोन्ही शाळेतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमातुन लाभ झाला.ऋषिकेश सुरसे ह्यांनी विषारी आणि बिनविषारी सर्प ह्यावर प्रझेंटेशन दिले.
आपल्या देशात सर्पाच्या सुमारे ३०० हून अधिक जाती आहेत. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चारच जाती विषारी आहेत.हे साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने माणसाचा मृत्यू होतो. आपल्या देशात दरवर्षी सर्पदंशामुळे किमान ४५ हजार जणांचा मृत्यू होतो. विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर प्रतिसर्प विष औषध म्हणून वापरले जाते; पण आपल्याकडील अनेक गावांतील सरकारी दवाखान्यांत हे औषध उपलब्ध नसते. या औषधाचा प्रसार अधिक झाल्यास आपण सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखू शकतो. साप हा कधीच आपणहून माणसाला चावत नाही.तो स्वयंसंरक्षण म्हणून माणसावर हल्ला करतो.अनेकदा लोक साप दिसल्यावर त्याला मारण्यासाठी धाव घेतात. त्यांनी तसे न करता त्याच्या संरक्षणाचे अधिक प्रयत्न केले तर ही नैसर्गिक संपदा मानवाच्या भल्यासाठीच कामी येईल आणि या करिता सर्पमित्र अहोरात्र साप मानवी वस्तीतून पकडून जंगलात सोडतात अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सापाला मारल्याने निसर्गाचे संतुलन ढळते, शिवाय जर आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व सापांना मारले तर आपल्या भागात उंदीर, घुशींचे साम्राज्य पसरून अब्जावधी टन अन्नधान्याची नासाडी होईल हे विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यात आले. डॉ.निलेश भणगे ह्यांनी सर्प दंश कसा टाळता येईल आणि साप लावल्यानंतर प्राथमिक दक्षता कोणती घ्यावी ह्याबद्दल माहिती दिली.