महिलांवर अत्याचार करणारी प्रवृत्ती टाचेखाली चिरडून टाका



चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला संताप

पीडितेला योग्य न्याय न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरणार

रायगड (धनंजय कवठेकर) : मुलांना, पुरुषांना मर्दानगीच्या खोट्या चौकटीत अडकवणारे, असुरक्षित जीवनशैली जगायला भाग पाडणारे, नकारात्मक सत्तेचे, पुरुषप्रधानतेचे अवडंबर माजवणाऱ्या विचारांना तिलांजली दिली पाहिजे. त्यानंतरच माणूसपणाकडे नेणाऱ्या, समानता मानणाऱ्या हिंसाविरहित सुदृढ समाजाकडे आपली वाटचाल सुरू होईल. परंतु, संबंधित सरकार हे अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत असल्याचे कोलकाता, उरण, बदलापूर येथील घडलेल्या घटनेवरून दिसून येते. यासाठी अशा प्रवृत्तींना वेळीच टाचेखाली चिरडून टाकण्याची आज वेळ आली आहे, असा संताप शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. पीडितांना योग्य न्याय न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला. 




कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर बदलापूर येथील एका  शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याआधी उरण येथील यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्यावरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. राज्यात अशा घटना कोठेना कोठे घडत आहेत. महिला, मुली आणि बालकांना संरक्षण देणे ही सरकाराची जबाबदारी आहे. परंतु, आताचे सरकार हे माझी लाडकी बहीण योजनेत मशगुल झाले आहे. तर, दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महिलांच्या बँक खात्यात तुम्ही पैसे भराल; पण त्यांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे.



घरातील आणि बाहेरच्या बाईकडे मालकीची वस्तू, उपभोगाचे साधन म्हणून बघायची दृष्टी समाजच देत असतो. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थाही याला अपवाद नाही. आपल्या हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हा पुरुषांचा दृष्टिकोनच महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरत असून, लाडकी बहीण रडतेय, सरकार काय करतेय, अशी म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.  स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिंसेच्या घटना आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या यांची आता समाजाला सवय झाली आहे. रोज वर्तमानपत्रात किमान एक तरी विनयभंगाची आणि बलात्काराची बातमी असते. अशा घटनांमध्ये फक्त लैंगिक शोषणाचा उद्देश दिसत नाही, तर त्यापलीकडची अत्यंत क्रूर आणि हिंसक मानसिकता समोर येते. या मानसिकतेला नाते, वय, शिक्षण, जात, धर्म असा कुठलाच स्पष्ट चेहरा नाही. कधीपर्यंत मेणबत्त्या जाळायच्या? आता विकृत मनोवृत्तीला जाळून टाकण्याची वेळ आली आहे, असा संताप चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.




अत्याचाराला सामोरे जावे लागणाऱ्या बालिका, मुली आणि महिलांचाही आता विशिष्ट वयोगट राहिलेला नाही. देशात आणि राज्यात महिला, मुली, लहान बालकं सुरक्षित ठेवायची असतील तर अशा नराधमांना सुळावर चढवले पाहिजे. यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करून फाशीच्या शिक्षेची तरतूद केल्यास कोणताही पुरुष असे कृत्य करण्यास धजावणार नाही.


बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करते. राज्यात महिलांसह लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही प्रवृत्ती अत्यंत हीन दर्जाची असून, समाजातील नराधम आता लहान मुलींपर्यंत पोहोचले आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सरकार याविरोधात सक्त कारवाई करणार का, असा प्रश्न आहे. शाळा हे मुलींसाठी अत्यंत सुरक्षित समजले जायचे; परंतु ते आता सुरक्षित राहिलेले नाही. ज्या शाळांमध्ये असे प्रकार घडतात, अशा शैक्षणिक संस्थांसह त्या शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याची गरज आहे. मुलींचे संरक्षण करणे संबंधित शाळांची जबाबदारी आहे. रायगड जिल्ह्यातली पोस्को न्यायालय पुन्हा सुरु करुन संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करुन पीडितेला न्याय देणे गरजेचे आहे.

- ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख                                                                                                                                                                                                



Post a Comment

Previous Post Next Post