शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांसोबत -दिलीप भोईर (छोटमशेठ)
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : मयेथील भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या जाऊ देणार नाही. शेतकरी बांधवांचा प्रकल्पाला विरोध नाही, त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी राजकीय भूमिकेपलीकडे जाऊन शेतकरी बांधवांना माझा पाठिंबा आहे. अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यकक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी स्पष्ट केली. ते सुभाषनगर-पोयनाड येथे शेतकरी परिषदेत बोलत होते.
शहापूरच्या ९गांव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्थेने आपल्या न्याय्य हक्कांच्या जपणुकीसाठी पेझारी येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता,जमिनी अल्पदराने विकणार नाही. सर्वांगीण प्रगतीसाठी प्रकल्प आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी हक्काच्या जमिनींचा लिलाव होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका या शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे.भूमिपुत्रांचा हा आवाज सरकारपर्यंत नेण्यासाठी मी वचनबद्ध आहे. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा १९२, अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूकप्रमुख दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी या परिषदेत उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
यावेळी भाजप सोशल मीडियाचे मंडल सहसंयोजक अमित म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण धुमाळ, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्वं सदस्य, शेतकरी बांधव, युवा कार्यकर्ते राजेश पाटील, नयन पाटील, निलेश पाटील, चेतन पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.