नवी दिल्ली : टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. जडेजा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो तर बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय खेळाडूंना जवळपास एक महिन्याची सुट्टी मिळाली आहे. मेन इन ब्लूला पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बुमराहला बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेश मालिकेनंतर टीम इंडियाला सतत क्रिकेट खेळावे लागणार आहे. त्यामुळे बुमराहला सध्या विश्रांती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, जिथे ४ कसोटी सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसोबत कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे.