मुंबई : राज्यात सगळीकडे दहीहंडीचा जल्लोष सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये सर्वाधिक हंड्या लावल्या जातात त्याहूनही प्रत्येक दहीहंडीत मोठमोठ्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी राज्यभरातून गोविंदा पथक मुंबई आणि ठाण्यात येत असतात. उंचउंच थर लावण्याच्या या स्पर्धेत अनेक गोविंदा जखमी देखील होत असतात. संध्याकाळपर्यंत १०६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली.
या जखमी गोविंदांपैकी १५ जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून १७ जणांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू होते. तसेच ७४ जणांना मंगळवारी उपचार करून घरी सोडण्यात आले. गोविंदांपैकी काही राजावाडी रुग्णालयात होते, तर काही केईएम रुग्णालयात, सेंट जॉर्ज रुग्णालय, एमटी रुग्णालय आणि कुर्ला भाभा रुग्णालयात होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. अनेक प्रमुख 'गोविंदा पथक' (समूहांनी) शहरातील अनेक ठिकाणी नऊ थर लावण्याचा प्रयत्न केला. अनेक महिला गोविंदा पथक देखील दहीहंडीच्या थरांच्या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
महाराष्ट्राच्या काही भागात आणि इतरत्र लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, अनेक गोविंदा गटांनी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी दहीहंडी फोडताना बॅनर आणि पोस्टरद्वारे सामाजिक संदेश देखील प्रदर्शित केले.
या उत्सवामुळे शहरातील अनेक भागात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पार्क केलेल्या दुचाकी आणि गोविंदांच्या इतर वाहनांमुळ वाहतूककोंडीत अधिक भर पडली.