नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नवी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावात कोणताही बदल झालेला नाही.
सोमवारी भाजपने ४४ उमेदवारांची तिन्ही टप्प्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती मात्र, काही वेळानंतर ही यादी मागे घेण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत ४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी दहा आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. ही यादी जाहीर होताच जम्मू भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, कार्यकर्त्यांनी देखील संतप्त होत कार्यालयात गोंधळ घातला.
पहिल्या यादीत माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांना तिकीट देण्यात आले नव्हते. २०१४ मध्ये बिलवार विधानसभा मतदारसंघातून निर्मल सिंह विजयी झाले होते. त्यांच्यासोबतच माजी उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता यांच्या देखील नावाचा समावेश नव्हता मात्र पुढील यादीत त्यांचे नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचेही नाव या यादीतून कट करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी
अभियंता सय्यद शौकत गायूर पंपोरमधून, अर्शीद भट राजपोरामधून, जावेद अहमद कादरी हे शोपियांमधून, मोहम्मद रफिक वानी हे अनंतनाग पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. अधिवक्ता सय्यद वजाहत अनंतनागमधून, शगुन परिहार किश्तवाडमधून आणि गजयसिंह राणा डोडामधून निवडणूक लढवणार आहेत. श्रीगुफ्वारा बिजबेहारा येथून सोफी युसूफ, शांगुश अनंतनागमधून वीर सराफ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंदरवालमधून तारिक कीन, पडेर नागसेनी मतदारसंघातून सुनील शर्मा, भदेरवाहमधून दिलीप सिंह कुटुंबीय रिंगणात आहेत. बनिहालमधून सलीम भट्ट, रामबनमधून राकेश ठाकूर आणि दोडा पश्चिममधून शक्तीराज परिहार यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसर्या टप्प्यातील उमेदवारांची नावे मागे घेतली
हब्बाकडल मतदारसंघातून अशोक भट्ट, गुलाबगड (एससी) विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद अक्रम चौधरी, रियासी मतदारसंघातून कुलदीप राज दुबे, माता वैष्णोदेवी मतदारसंघातून रोहित दुबे, कालाकोट-सुंदरबनी येथून ठाकूर रणधीर सिंग, बुधल (एससी) मतदारसंघातून चौधरी झुल्फिकार अली, थन्नामंडी मोहम्मद इक्बाल मलिक यांना (SC) जागेवरून तिकीट देण्यात आले होते. सुरनकोट (एसटी) मतदारसंघातून सय्यद मुश्ताक अहमद बुखारी, पूंछ हवेली मतदारसंघातून चौधरी अब्दुल गनी, मेंढार (एसटी) मुर्तझा खान यांना तिकीट देण्यात आले होते, तरीही भाजपने ही यादी मागे घेतली होती.
तिसर्या टप्प्यातील उमेदवारांची नावे मागे घेतली
पवन गुप्ता यांना उधमपूर पश्चिम मतदारसंघातून, बलवंत सिंग मनकोटिया यांना चिनानी विधानसभा मतदारसंघातून, सुनील भारद्वाज यांना रामनगर (एससी) मतदारसंघातून आणि जीवन लाल यांना बानीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश शर्मा यांना बिलवारमधून तर दर्शन सिंह यांना बसोली मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. जसरोटा मतदारसंघातून राजीव जसरोटा, हिरानगरमधून विजय कुमार शर्मा, रामगड (एससी) मतदारसंघातून डॉ. देविंदर कुमार मनियाल, सांबामधून सुरजीत सिंग सलाथिया यांना तिकीट मिळाले आहे. भाजपने विजयपूरमधून चंद्रप्रकाश गंगा, सुचेतगड (SC)मधून घारू राम भगत, आरएसपुरा-जम्मू दक्षिणमधून डॉ. नरिंदर सिंग रैना आणि जम्मू पूर्वमधून युद्धवीर सेठी यांना तिकीट दिले होते.