डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र
लुसाने : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले. नीरज डायमंड लीग स्पर्धेत आपल्या लयीत न दिसल्याने सातत्याने अँडरसन पीटर्सच्या मागे राहिला. नीरजला पहिल्या चार प्रयत्नांत चांगली कामगिरी करता न आल्याने सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर होता. मात्र पाचव्या प्रयत्नात त्याने आपली ताकद दाखवून पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. मात्र, अंतिम प्रयत्नात नीरजने ८९.४९ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून मोसमातील आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि दुसरा क्रमांक पटकावला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने सहाव्या प्रयत्नात ९०.६१ मीटरचा विक्रमी थ्रो करून विजेतेपद पटकावले. यासह नीरज पुढील महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
सहाव्या प्रयत्नापर्यंत नीरज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नव्हता. त्याने ८२.१० मीटरच्या थ्रो ने सुरुवात केली. परंतु अखेरीस त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील ८९.४५ च्या थ्रोला मागे टाकले. येथेही नीरजला ९० मीटरचा थ्रो करता आला नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८७.०८ मीटर्स फेक करून तिसरे स्थान पटकावले.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीगमध्ये ८२.१० मीटर थ्रो करून पदार्पण केले. तथापि, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८६.३६ मीटर, तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पहिल्याच प्रयत्नात ८५.०७ मीटरचा भाला फेकला. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वाल्देझने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. पहिल्या प्रयत्नानंतर नीरज चौथ्या स्थानावर राहिला, तर अँडरसनने आपली आघाडी कायम राखली.
पहिला प्रयत्न संपल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि त्याने ८३.२१ मीटरचा थ्रो केला. ज्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर राहिला. अँडरसन पीटर्सने दुसऱ्या प्रयत्नात ८८.४९ मीटरचा फेक करून आपले अव्वल स्थान कायम राखले. दरम्यान, ज्युलियनने दुसऱ्या प्रयत्नात ८७.०८ मीटर फेक करून दुसऱ्या स्थानावर राहिला. दुसऱ्या प्रयत्नातही वाल्देझची कामगिरी चांगली झाली नाही आणि त्याने केवळ ७८.२३ मीटरचा फेक केला आणि तो आठव्या स्थानावर घसरला. मात्र, आर्थर फेल्फनरने ८३.३८ मीटरचा थ्रो केल्यामुळे नीरज पुन्हा चौथ्या स्थानावर घसरला.
तिसऱ्या प्रयत्नातही नीरजला काही आश्चर्यकारक करता आले नाही आणि त्याने ८३.१३ मीटरची नोंद केली. अँडरसनने तिसऱ्या प्रयत्नात ८७. ४० मीटरा फेक केला जो त्याच्या सर्वोत्तम थ्रोपेक्षा कमी होता, परंतु तो अव्वल स्थानावर राहिला. तर, ज्युलियनने ८१.८७ मीटरचा थ्रो केला. तिसऱ्या प्रयत्नानंतरही नीरज चौथ्या स्थानावर राहिला.
नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२. ३४ मीटरचा फेक केला. चौथ्या प्रयत्नातही नीरजला चांगली कामगिरी करता आली नाही. अँडरसन पीटर्सने चौथ्या प्रयत्नात ८६.५९ मीटरची नोंद केली. तर ज्युलियन आणि आर्थरने फाऊल केले. वाल्देझने चौथ्या प्रयत्नात ८२.०३ मीटर फेक केला. चौथा प्रयत्नानंतरही नीरजला आपली क्रमवारीतील जागा बदलता आली नाही.
नीरजने पाचव्या प्रयत्नात शानदार पुनरागमन करत ८५.५८ मीटरचा भाला फेकला, तो नीरज तिसऱ्या क्रमांकावर आला. अँडरसनने ८२.२२ मीटर तर ज्युलियनने पाचव्या प्रयत्नात ८०.४७ मीटर फेक केला. मात्र, या प्रयत्नात नीरजच्या मागे पडूनही अँडरसन अव्वल स्थानावर राहिला. पाचव्या प्रयत्नात नीरज आघाडीवर राहिला.
नीरजने सहाव्या प्रयत्नात चमकदार कामगिरी करत या मोसमातील ८९.४९ मीटरचा आपला सर्वोत्तम थ्रो केला आणि तो तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला. मात्र, नीरजपुढे थ्रो करण्यासाठी आलेल्या अँडरसनने शेवटच्या प्रयत्नात ९०.६१ मीटरची नोंद करत अव्वल स्थानावर आपला दावा मजबूत केला. अँडरसनचा हा थ्रो त्याच्या या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे, तर डायमंड लीग मीटमधील हा विक्रमही आहे.

