दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा येथील ओम साई शिक्षण संस्था संचालित एस. एम. जी. विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विभागात मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आईचे मनोभावे पूजन करून वंदन केले. तसेच सर्व मातांचे स्वागत पुष्पवृष्टी करुन करण्यात आले.
मातृदिन हा दिवस आपल्या आईवरचे प्रेम, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थांनी सुंदर नृत्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच आईच्या ऋणात राहणेच योग्य असल्याची भावना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. माता पालकांनी विविध खेळातून, नृत्यातून, गाण्यातून विद्यार्थ्यां प्रती प्रेम व्यक्त केले.
मुख्याध्यापक अनंत धाडवे यांनी आई आहे म्हणून मी आहे, हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावे व मातृदिनाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. शिक्षिका गार्गी सैतावडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर सर्व आई व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.