स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली पूर्वेकडील सुनीलनगर परिसरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात शनिवार ५ तारखेला सकाळी आठ वाजता उद्यानाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ पार पडला.

   सदर उद्यानात नागरिक निसर्गाच्या सान्निध्यात चालणे, व्यायाम करणे यांसारख्या शारीरिक क्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने येतात. विशेषतः सकाळी ६ ते ९ या वेळेत आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबे लहान मुलांसह उद्यानात भेट देतात. उद्यानातील सुकलेल्या पानांमुळे होणारा कचरा नियमितपणे न साफसफाई केल्याने येथील वातावरण दूषित होत होते.उद्यानात नियमित येणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच हातात झाडू घेऊन उद्यानाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

     दररोज सकाळी व्यायामासाठी येणारे हे ज्येष्ठ नागरिक उद्यानात सुकलेली पाने, प्लास्टिक आणि इतर कचरा वेचून स्वच्छता करतात.त्यांनी हे काम केवळ समाजसेवेच्या भावनेतून हाती घेतले असून उद्यानातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या सततच्या सेवेमुळे उद्यानाचे सौंदर्य आणि स्वच्छता कायम राखली गेली आहे.

सदर सत्कार समारंभात उपस्थित सर्व मान्यवर नागरिकांनी शरद जोशी, राजेंद्र मुळे, विकास सावकारे, सचिन विरनोडकर, केशव करकेरा, माधुरीताई कोरडे, प्रसाद सावंत आणि रेखा नारखेडे या ज्येष्ठ नागरिकांना शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेणाऱ्या या नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.माजी नगरसेवक व शिवसेना कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने, उद्योजक विक्रम म्हात्रे आणि इंटेरियर डेकोरेटर्स प्रदीप सुधाकर पवार यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा पार पडला.




Post a Comment

Previous Post Next Post