Naxalites encounter : दंतेवाडा, नारायणपूर येथील चकमकीत ३१ नक्षलवादी ठार




छत्तीसगड :  छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  मात्र, आतापर्यंत २८ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.  छत्तीसगडमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी नक्षलवादी चकमक असून या पावसाळ्यात झालेल्या चकमकीत २३५ नक्षलवादी मारले गेले आहेत.


बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मृतदेह हाती लागले असून आणखी तीन ते चार मृतदेह बाहेर काढले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारसूरच्या हंदवाडा पार आणि ओरछा ब्लॉकच्या थुलाथुलीच्या जंगलात नक्षलवादी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर कारवाईदरम्यान ४०० हून अधिक जवान ऑपरेशनसाठी आले होते. डीआरजी आणि एसटीएफचे जवान गोवेल, नेंदूर आणि थुलाथुली गावाकडे निघाले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी गोळीबार केला. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या चकमकीत AK-47 सह अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. 




या चकमकीत नक्षलवाद्यांची पूर्व बस्तर विभागीय समिती नष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. कमलेश उर्फ ​​आरके ज्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. ते पूर्व बस्तर विभाग समितीचे प्रभारी होते. DKSZC चे सदस्य देखील होते. या चकमकीत तो मारला गेला असल्याचे देखील म्हटले जात आहे. डीव्हीसी सदस्य स्तरावरील नेत्याची हत्या झाल्याचेही पोलीस अधिकारी सांगत आहेत. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाल्याचा दावा दंतेवाडा एसपी एस. गौरव राय यांनी केला आहे. यात अनेक नक्षलवादी जखमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे. ही चकमक बारसूरच्या हंदवाडा पार आणि ओरछा ब्लॉकच्या थुलाथुलीच्या जंगलात झाली.


गेल्या पाच दिवसांपासून अबुझमद येथे नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे दंतेवाडा आणि नारायणपूर पोलिसांनी दुपारी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. (CG मध्ये नक्षल चकमक) या ऑपरेशनमध्ये DRG आणि STF चे जवान सहभागी झाले होते. 





Post a Comment

Previous Post Next Post