मतदानाचा हक्क बजावून मतदानाची राष्ट्रीय सरासरी गाठुया

 


 जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवलीतील मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत केलेल्या मतदानामुळे, मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. आता सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा पवित्र हक्क बजावून, मतदानाची राष्ट्रीय सरासरी गाठुया असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. 




सार्वत्रिक विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभुमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज डोंबिवलीतील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील EVM सुरक्षा कक्षाची व मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली आणि एकूण व्यवस्थेबाबत दोन्ही अधिका-यांनी समाधान व्यक्त केले व निवडणूक यंत्रणेस शुभेच्छा दिल्या. 


तद्नंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील १४४-कल्याण ग्रामीण मतदार संघाच्या शुभ्र फलकावर (कॅन्व्हासवर) मतदानाचा हक्क बजाविणेबाबत आवाहन स्वरुपात आरेखन करीत आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटविली. 


यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, राजू राठोड, संजय भोये तसेच निवडणूक कर्तव्यावरील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.





Post a Comment

Previous Post Next Post