बंगळुरू : " गव्हर्मेंटऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स " यांच्या माध्यमातून होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स अकॅडमी बंगळुरू ( कर्नाटक ) येथे राष्ट्रीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यातील "ऑल इंडिया वॉटरमनशिप " हा अत्यंत कठीण आणि तितकाच महत्त्वाचा असलेला पाठ्यक्रम , देशभरातून निवडक उमेदवारांची या अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. जो वर्षातून फक्त दोनदाच होतो. सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेला हा कोर्स नुकताच संपन्न झाला. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र नागरी संरक्षण संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त दोन सीट असतात ज्यासाठी नागरी संरक्षण ठाण्याचे उप नियंत्रक विजय जाधव यांनी "जयेश अहिरे" आणि "रामबरण यादव" या दोन स्वयंसेवकांची निवड करून प्रस्ताव पाठविला होता. राज्य स्तरावर देखील त्यांची निवड झाली आणि ती निवड अतिशय योग्य असल्याचे त्यांनी घवघवीत यश संपादन करून सिद्ध केले.
या कोर्समध्ये पुरविमोचन व बचाव संदर्भातील प्रशिक्षण मुख्यत्वे दिले जाते. ज्यात पुराच्या पाण्यात साधी होडी, यांत्रिक होडी चालवणे, तराफा बनवणे, विमोचन पथक तयार करणे, उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून पूर-बचाव साधने ( floating aids ) तयार करणे. नागरिकांचे पूरपरिस्थितीमध्ये स्थलांतर इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण होते. यात प्रशिक्षणार्थीचा कस लागतो. अतिशय खडतर अस हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शेवटच्या २ दिवसात शिकवलेल्या सर्व अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिकांसह परीक्षा घेतली जाते. आणि ती यशस्वीपणे पार पाडणाऱ्या उमेदवारांना शासनाचे प्रमाणपत्र दिले जाते. जयेश आणि रामबरण या दोन्ही स्वयंसेवकांनी सदर खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि प्रशिक्षणा पश्चात परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्राची मान उंचावली आहे त्याबद्दल त्यांचे दोघांचेही कौतुक केले जात आहे. त्यांच्यावर नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे सदर राष्ट्रीय स्तरावरील "ऑल इंडिया वॉटरमनशीप" हा कोर्स नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे उपनियंत्रक विजय जाधव तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी आणि मानपाडा-डोंबिवली विभागाचे विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांनी व्यक्तिशः जयेश अहिरे आणि रामबरण यादव ह्या दोघांचेही भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांना , विशेषतः तरुण विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण संघटने मध्ये सहभागी होऊन अशाप्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे नागरिकांना शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत प्राथमिक प्रशिक्षण घ्यायचे असल्यास नागरी संरक्षण संघटनेचे कल्याण येथील कार्यालयाशी संपर्क करू शकतात.