डोंबिवली ( शंकर जाधव ) : गायी व म्हशींना देण्यात येणाऱ्या ऑक्सीटोसीन इंजेक्शनचे बेकायदेशीर उत्पादन करणाऱ्या एकाला कल्याण गुन्हे अव्हेशन विभागाने अटक केली. मंगळवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेने गोंविंदवाडी, कल्याण पश्चिम येथील एका चाळीत छापा मारला.सदर ठिकाणी हा इसम अनधिकृतपणे ऑक्सीटोसीन इंजेक्शनसाठी लागणारे औषध तयार करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मसी सादीक खोत (५० रा. कल्याण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या छाप्यात १,५९,७९८ रुपये किमतीचे १०६७ विना लेबलचे ऑक्सीटोसीन इंजेक्शनच्या बॉटल, कच्चा माल, तसेच बॉटल सीलिंग मशीन जप्त करण्यात आले. या औषधाचा गायी व म्हशींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या दुधामध्ये मानवांसाठी हानिकारक घटक निर्माण होऊ शकतात, असे प्रशासनाने सांगितले.
या प्रकरणी मसी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २१०, २७४, २७६ तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण करत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.