सरकारचा वचनपूर्ती सोहळा बेतला बहिणींच्या जीवावर
८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर
रायगड ( धनंजय कवठेकर ): रायगड येथे बुधवारी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला लाडक्या बहिणी बसने जात होत्या. माणगाव तालुक्यातील मांजरे घाटात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस २० फूट दरीत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील 8 लाडक्या बहिणी जखमी झाल्या असून अन्य एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव , पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. माणगावमधील धनसे क्रीडांगणावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला गर्दी व्हावी म्हणून लाडक्या बहिणींना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस अनेक गावांमध्ये महिलांना घेऊन येत होत्या. अशीच एक बस माणगाव तालुक्यातील मांजरोणे येथील रानवडे खुर्द गावातील महिलांना आणण्यासाठी पाठवण्यात आली होती. या बसमधून जवळपास २९ ते ३० महिला जात होत्या. मात्र, माणगाव तालुक्यातील मांजरे घाटातील अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस २० फूट खोल दरीत कोसळली.
सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, या अपघातात ८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.