Maharashtra assembly elections 2024: निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर कल्याण ग्रामीण जिंकणार

 




शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात 
माजी आमदार सुभाष भोईर यांचा निर्धार 


डोंबिवली ( शंकर जाधव )  : कल्याण ग्रामीण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून कडवट व निष्ठावंत शिवसैनिकांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर कल्याण ग्रामीण विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात व्यक्त केला. 

सोनारपाडा येथील दुर्वांकुर सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य मेळावा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षात शिवसैनिकांनी मेहनत घेतल्यामुळे व मतदारांनी प्रचंड विश्वास दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. या पाच वर्षात जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यानंतरची देखील पाच वर्ष आमदार असताना मंजूर केलेली कामे पूर्ण करून जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. यापुढे देखील जनतेच्या विश्वासावर आणि शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर कल्याण ग्रामीण जिंकू असा निर्धार व्यक्त केला. 

कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आजारी असताना गद्दारी करून कशाप्रकारे विश्वासघात केला गेला. येणाऱ्या निवडणुकीत सडेतोड उत्तर देण्यास निष्ठावंत शिवसैनिक सज्ज असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी कल्याण ग्रामीणचा आमदार निवडून देवू त्यासाठी शिवसैनिक अहोरात्र  मेहनत घेईल असा विश्वास व्यक्त केला.

   जिल्हा संघटिका वैशाली दरेकर यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मोठी असून सोबतीला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष साथीला असल्याने विजय सोपा होणार असल्याचे सांगितले. यावेळी संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा युवा अधिकारी प्रतिक पाटील, उपजिल्हा प्रमुख अशोक महाराज म्हात्रे, संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, तालुका प्रमुख मुकेश पाटील, सुरेश पाटील, शहर संघटिका मंगला सुळे, ज्योती पाटील, माजी नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती जाईबाई पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर समन्वयिका प्रियांका सावंत, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्यासह कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवासैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post