आणि दिवा पोलिसांची धडक कारवाई
दिवा, (आरती परब) : दिवा पोलीस चौकीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मितीविरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. दिवा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या आदेशानुसार आगासन खाडीत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे ९५४० हजार लिटर रसायन व दारू बनण्याचे साहित्य असा सुमारे दोन लाख सोळा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांनी दिली.
निवडणुकीच्या काळात मद्य विक्री, मद्य निर्मितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे दिले असून, मद्य विक्रीची प्रत्येक दिवसांच्या व्यवहाराबरोबर अवैध्य रीत्या गावठी हातभट्टी बनविणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाईचे आदेश देत सदरची माहिती आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार दारू निर्मिती कारखान्यांवर पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीसीटीव्हीचा २४ तास वॉच सुरू राहणार आहे. विक्री, निर्मिती व अवैद्य विक्रीसाठी लक्ष ठेवण्यासाठी पथकेही नियुक्त केली आहेत.
निवडणुकीत वस्तू, पैशांबरोबर मद्याचे प्रलोभने मतदारांना उमेदवारांचे प्रतिनिधी दाखवत असतात. त्यामुळे आयोगाचे या सगळ्या बाबिंवर करडी नजर आहे. मद्यनिर्मिती, ठोकविक्रेते, किरकोळ विक्रेत्यांची दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे आदेश आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दररोज दारू विक्रीची माहिती सादर केली जाते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखाली ही कालची कारवाई झालेली आहे.
काल दुपारी तीनच्या सुमारास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगासन गावा शेजारील खाडी मधील बेटावर दोन इसम हातभट्टीची गावठी दारू बनवीत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांना मिळताच त्यांनी दिवा पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर आणि दिवा पोलीस चौकीतील तपास पथकातील अंमलदारांना त्या ठिकाणी तातडीने जाऊन गैरप्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्या दिलेल्या सूचनेनुसार सहाययक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर व पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, आगासन गावाशेजारील खाडीमधील बेटावर झाडीमध्ये दोन इसम निळ्या रंगाचे ड्रममध्ये हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन (वॉश) लाकडी दांड्याने ढवळत असताना दिसून आले. स.पो.नि. अमोल कोळेकर व पथकाने कंबरभर पाण्यातून सदर इसमांचा पाठलाग केला, परंतू पोलीस पथक तेथे आल्याची चाहूल लागताच ते इसम झाडीमध्ये पळून गेले. पोलीस पथकाने सदर परिसराची पाहणी केली असता, तेथे ३००० लिटर क्षमतेचा गावठी दारू बनविण्याचा ढोल, एक गावठी दारू बनवण्याची भट्टी आणि झाडीमध्ये निळ्या रंगाच्या ५३ प्लास्टिकच्या ट्रकमध्ये गावठी दारू बनविण्याचे रसायन (प्रत्येकी १८० लिटर रसायन, एकूण ९५४० लिटर रसायन) असा मुद्देमाल मिळून आला. तपासणी कामी एक लिटर गावठी दारू बनवण्याचे रसायन दोन पंचा समक्ष एका बाटलीमध्ये घेऊन उर्वरित मुद्देमाल लोखंडी ढोल, ५३ प्लास्टिकचे ड्रम आणि त्यामधील गावठी दारू बनविण्याचे रसायन असे खाडीमधून बाहेर आणणे शक्य नसल्याने तो मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पथकात फौजदार सुभाष मोरे, पोलीस नाईक निळकंठ लोंढे, पोलीस शिपाई वसीम तडवी, पोलीस शिपाई नितीन धायगुडे, पोलीस शिपाई उमाकांत गायकवाड यांनी ती करवाई यशवी रित्या पूर्ण केली.