जिल्हा रुग्णालयात डायलेसिससाठी सीएसआरची आर्थिक मदत



रायगड, (धनंजय कवठेकर):  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)थळ तर्फे रायगड जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांना औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी वीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर)च्या माध्यमातून देण्यात आले आहे. आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांनी दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी-रायगड किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्मक डॉ. अंबादास देवमाने यांना सदर रकमेचा धनादेश सुपूर्द केला.


रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिमाह सुमारे ६०० डायलेसिस सेशन्स होत असतात ज्यात जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर डायलेसिस उपचार केले जातात. या रुग्णांकरिता कंझ्युमेबल्स, सोल्युशन्स व औषधे खरेदीसाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबतचे विनंती पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांद्वारा आरसीएफला प्राप्त झाले. या महत्वपूर्ण औषधांची रुग्णांसाठीची आवश्यकता लक्षात घेऊन आरसीएफ व्यवस्थापनाने संचालक मंडळाच्या बैठकीत सुमारे २० लाख रुपयांचे अर्थसहाय्य सीएसआर अंतर्गत तात्काळ मंजूर करून घेतले. आणि दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विशेष कार्यक्रमात या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी-रायगड किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्मक डॉक्टर अंबादास देवमाने यांना सुपूर्द केला. यावेळी आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांसह संजीव हरळीकर, महाव्यवस्थापक (मासं व प्र, ईटीपी), महेश पाटील प्रभारी मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) व संतोष वझे (जनसंपर्क अधिकारी) उपस्थित होते.


समाजातील गरजूंना लाभदायी ठरतील अशा विविधांगी योजनांसह अलिबाग परिसरातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल अशा योजना कर्तव्यनिष्ठेने आणि प्राधान्यक्रमाने राबविण्यावर आरसीएफचा नेहमीच भर राहिला आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून एकंदरीत समाज उन्नयनासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे.

Post a Comment

Previous Post Next Post