कोल्हापूर, (शेखर धोंगडे) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध उत्पादकांसाठी राबविण्यात आलेल्या गोबरसे समृद्धी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोकुळच्या ५,७४३ दूध उत्पादकांना अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बायोगॅस योजनेमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना २० कोटी २५ लाख इतके अनुदान देण्यात आले आहे.
कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. मागील वर्षी या योजनेला दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या योजनेचा दुसरा टप्पा २०२४-२५ साली राबविण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यात नवीन ४,००० बायोगॅस मंजूर झाले असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
या योजनेमधील बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता व सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सुधारणा केल्या असून, यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण कालावण्यासाठी मिक्सिंग टूल (मिक्सर), गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी व्हॉल्व व पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्बन क्रेडीट अनुदानात घट झाल्यामुळे सिस्टीमा कंपनीच्या टप्पा दोन मधील नवीन बायोगॅसचे अनुदान कमी झाले आहे. २ घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण रु.४१,२६० इतकी किमत असून, अनुदान वजा जाता रुपये ९,९९९ इतकी रक्कम दूध उत्पादकांनी भरणा करावयाची आहे. बायोगॅसचे अंतर १५० फुटापेक्षा जास्त असलेस १५०० रुपये बुस्टर पंपासाठी भरावयाचे आहे.