कल्याण, ( शंकर जाधव) : किंगडम ऑफ नेदरलॅन्डचे कंन्सुलेट जनरल थीअरी व्हॅन हेल्डन व इतर शिष्टमंडळ यांच्या निवेदनानुसार घनकचरा व्यवस्थापनाबाबत कल्याण- डोंबिवली महानगरपालिका राबवित असलेल्या घनकचरा प्रक्रीया प्रकल्पाच्या पाहणी दौ-याचे आयोजन काल करण्यात आले होते. यावेळी शिष्टमंडळ व नेदरलॅन्ड मधील इतर कंपन्यांनी नेदरलॅन्डमध्ये राबविण्यात येणा-या घनकचरा प्रकल्प, वेस्ट टु एनर्जी प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, हवा प्रदुषण नियंत्रण उपकरणे तसेच Clear River पर्यावरण विषयक Best Practices बाबत दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण करून हवा व पाणी प्रदुषण नियंत्रण व नदी स्वच्छता कशी राखता येईल व त्यासंबंधीच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच याकामी वापरण्यात येणा-या उपकरणांची माहिती दिली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देवीदास पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहा. आयुक्त मयुरी कदम हे उपस्थित होते.
तद्नंतर संबंधित शिष्टमंडळाने महापालिका अधिका-यांसमवेत उंबर्डे, बारावे एकात्मिक घनकचरा प्रकल्प, आधारवाडी बायोमायनिंग प्रकल्प तसेच वालधुनी नदीची पाहणी केली. देशभरात घनकचरा प्रक्रीया प्रकल्प राबविणेकामी महाराष्ट्र सरकार व नेदरलॅन्ड सरकार यांनी सामंजस्य करार केला आहे. भारतामध्ये प्रती वर्षी सुमारे ६० मिलीयन मेट्रीक टन घनकच-याची निर्मिती होत आहे.
देशातील घनकच-याची जटिल समस्या सोडविणेसाठी भविष्यात काय उपाययोजना करता येतील याचा विचार करता, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उपाययोजना करणे आवश्यक आहेत. असे मत नेदरलॅन्डच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. याकामी केंद्र शासनामार्फत तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्यावर महापालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने उपरोक्त कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली. सदर पाहणी दौ-याचा कल्याण डोंबिवली महापालिका व एमएमआर क्षेत्रामध्ये निश्चित फायदा होणार आहे.