Maharashtra assembly elections 2024: संपूर्ण आयुष्यभर जनतेचा हमाल बनून सेवा करू



मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन 

कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापूरापुढे मी नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालीत आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही. सहाव्यांदा आमदारकीची संधी द्या, संपूर्ण आयुष्य जनतेचा हमाल बनून सेवा करेन असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.




अर्ज भरण्यापूर्वी एक लाखावर लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत बोलताना मंत्री मुश्रीफ बोलत होते. अकराच्या सुमारास मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले. आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. झेंड्यांनी आणि बॅनरनी सजवलेल्या ट्राॅलीतून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय दादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. 


एक लाखाहून अधिक संख्येने जमलेल्या गर्दीत महिला आणि वृद्ध महिलांचाही सहभाग लक्षवेधी होता. हि मिरवणूक शिवाजी पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेतून खर्डेकर चौक या मार्गावरून निपाणी वेशीपर्यंत पोहोचली. भर उन्हाच्या तडाख्यात अलोट गर्दीत आणि अमाप उत्साहात ही सभा बरोबर एक वाजता सुरू झाली, आणि दोन वाजता संपली. या कार्यक्रमास शहरातील या ऐतिहासिक मिरवणुकीने आजपर्यंतच्या मिरवणुका आणि गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले. अगदी निपाणीकडील कमानी पासून ते कागल कमान आणि त्याच्याही पुढे राष्ट्रीय महामार्ग पर्यंत गर्दीच-गर्दी होती.



मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघात लोकभावनेची कदर करून बांधलेली साडेसातशेहून अधिक मंदिरे असतील, याच्याही पलीकडे जाऊन गेल्या वीस पंचवीस वर्षात कागल तालुक्यातील गटबाजीला मूठमाती देऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे आलेला माणूस माझ्याकडे जनतेने दिलेली शक्ती आहे या भावनेने येतो, तेवढ्याच प्रमाणिक भावनेने मी त्यांचे काम करत असतो, विकासाचं राजकारण याच्यापेक्षा आणि काय असतं हे तुम्हीच मला सांगा.


माजी खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे आमदार-खासदार म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांनी मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी विकासकामांसाठी खेचून आणला आहे. या कामांच्या जोरावरच विकासाचा गाडा घेऊन प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने अर्ज भरणार आहेत. महायुतीची अभेद्य फळी त्यांच्या पाठीशी उभी असून मुश्रीफ यांना निवडून आणण्यासाठी आमची मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना सर्वात पुढे असेल. 




माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, मी दूधगंगा, वेदगंगा आणि अनेक नदी - नद्यांना आलेले पूर पाहिले आहेत. आज कागलमध्ये जमलेला लोकगंगेचा महापूर पहिल्यांदाच बघितला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून २३ तारखेला कागलात गुलाल उधळायला येऊ.


आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्लीतील दलित बांधवांना दिलेल्या जमिनी समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्या आणि हा माणूस आमदारकीचे स्वप्न बघत आहे अशा व्यक्तीला रोखणे गरजेचे आहे. मिळालेल्या मंत्रिपदाचा माज, मस्ती न करणारा सर्वसामान्यांमध्ये नेहमी मिसळून राहणारे, गोरगरिबांची कामे करणारे मंत्री हसन मुश्रीफ हे एका बाजूला आहे. निवडणुकीपर्यंत आपण सर्वांनी जागरूक आणि जपून राहणे गरजेचे आहे.


गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मत आणि मत गोळा करूया, विरोधकांकडे बूथ लावायलाही माणूस शिल्लक राहिला नाही पाहिजे. मंत्री मुश्रीफांचा विजय असा लक्षवेधी करूया, की विरोधकांनी पुन्हा लढण्यासाठी डोकेच वर काढले नाही पाहिजे.




Post a Comment

Previous Post Next Post