एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी दिवेकर काम करणार

 


दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांचे प्रतिपादन 

दिवा, (आरती परब) :  शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे दिवा शहरातील सर्व माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. सदर नाराजी वेगवेगळ्या समाज माध्यमांसमोर जाहीरपणे मांडली जात होती. तर रमाकांत मढवी यांना उमेदवारी नाकारल्याने डोबिंवलीतील शिवसेनेच्या निश्चित उमेदवाला दिव्यातून सहकार्य दिले जाणार नसल्याची अफवा देखील मोठ्या प्रमाणात उडाली होती. मात्र या सगळ्यांवर शनिवारी स्वतः दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिवा पूर्व येथील नरहरी समाज मंदिर येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांचा गैरसमज दूर करत आपण सर्वजण एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करणार असल्याचे घोषित केले. 

गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये दिवा शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या, आया बहिणींच्या हाकेला ओ देणाऱ्या, त्यांचा कित्येक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न सोडविणाऱ्या, लॉकडाऊनमध्ये हजारोंना स्वतः तेथे उभे राहून कोरोनाचा डोस देणाऱ्या अशा या दिव्याच्या शहर प्रमुखांना जेव्हा विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर हजारोंच्या संख्येने शेकडो कार्यकर्त्यांनी मढवी यांच्या राहत्या घरी मध्यरात्री भेट घेतली व जोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यावेळी रमाकांत मढवी यांनी आपण पुढील चार दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू व तोपर्यंत मी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार नाही, असं आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे डोंबिवलीतील शिवसेनेचे निश्चित उमेदवार राजेश मोरे हे उमेदवारीचा फॉर्म भरताना दिवेकरांनी नाराजी दाखवल्याचे त्यांना समजले. दिवेकरांची नाराजीची चर्चा पूर्ण डोंबिवली, कल्याण आणि कल्याण ग्रामीण मध्ये झाली. त्यानंतर अशा आपल्या शहरप्रमुखावर जीव ओवाळून टाकणाऱ्या  सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्ते, युवासेना व शिवसैनिक कार्यकर्त्यांची आज दुपारी बारा वाजता दिवा पूर्व येथील नरहरी समाज मंदिर येथे बैठक झाली. त्यात सर्वांची नाराजी काढत आपण एकनाथ शिंदें यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी एक दिलाने, एक मताने काम करणार असल्याचे रमाकांत मढवी यांनी जाहिर केले. 


या बैठकीत उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील नाराजी व रोष यावेळी व्यक्त केला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी रमाकांत मढवी जे ठरवतील तीच भूमिका घेण्याचे जाहीर केले. यावेळी सर्व उपस्थित शिवसैनिकांशी बोलताना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी एकनाथजी शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, मला पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे आपण निश्चित नाराज असाल परंतु आपल्याला धनुष्यबाणासाठी काम करावं लागेल असे सांगितले.


 यावेळी माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेवक दीपक जाधव, माजी नगरसेविका  दिपाली भगत, माजी नगरसेविका सौ. सुनीता मुंडे, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख अँड.आदेश भगत, गणेश मुंडे, विभाग प्रमुख उमेश भगत, विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख शशिकांत पाटील, विभागप्रमुख निलेश पाटील, विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, विभागप्रमुख भालचंद्र भगत, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, विभागप्रमुख राजेश पाटील, विभागप्रमुख विनोद मढवी, विभागप्रमुख सचिन चौबे, जगदिश भंडारी, सुरेश पाटील, विजय भोईर व सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, युवती सेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post