पाकिस्तानात खेळण्याला भारतीय संघाच्या विरोधानंतर आयसीसीचा निर्णय
नवी दिल्ली : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असून बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका देत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी होणाऱ्या प्री-टूर्नामेंट कार्यक्रम रद्द केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी लाहोर येथे ही स्पर्धा होणार होती.
१९ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२५ या कालावधीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारताच्या सहभागाबाबत आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, ८ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चाहत्यांचा उत्साह वाढवणे हा या पूर्व स्पर्धेचा उद्देश होता, मात्र आता आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. आम्ही अजूनही यजमान आणि सहभागी देशांसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करत आहोत. आयसीसीने अद्याप या स्पर्धेसाठी सुधारित योजना जाहीर केलेली नाहीत. पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारताच्या अनिच्छेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अधिकृत संवादाअभावी निराशा व्यक्त केली आणि ते म्हणाले की, जर त्यांना (बीसीसीआय) काही अडचण असेल तर त्यांनी ती आम्हाला लेखी स्वरूपात त्याची माहिती द्यावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आजपर्यंत आम्ही कोणत्याही हायब्रिड मॉडेलबद्दल बोललो नाही, परंतु आम्ही त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. याबाबत आयसीसीनेही अद्याप बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील वादाचा तोडगा काढलेला नसल्याचे देखील नक्वी यांनी म्हटले आहे.