खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला दिवाळी पहाट कार्यक्रम
डोंबिवली, (आरती परब) : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील फडके रोड येथे दरवर्षीप्रमाणे गुरुवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदाची दिवाळी पहाट ही खऱ्या अर्थाने विशेष ठरली ती सुप्रसिद्ध मराठी डीजे कृणाल घोरपडे अर्थातच '' डीजे क्रेटेक्स '' यांच्या सादरीकरणाने. डीजे क्रेटेक्स यांनी आपल्या डीजेवर सादर केलेल्या मराठी अजरामर गाण्यांवर मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभुषा करून तरुण - तरुणी जल्लोषात थिरकले आणि यंदाची दिवाळी पहाट ही संस्मरणीय ठरली.
.
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी विविध सणोत्सवाच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. याच पद्धतीने दिवाळी उत्सवाच्या काळात दरवर्षी डोंबिवली येथील फडके रोड येथे सर्वांना सुरेल संगीताची पर्वणी अनुभवता यावी यासाठी विविध दिग्गज आणि लोकप्रिय कलावंतांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील संपूर्ण तरुणाईला भुरळ घालणारा आणि त्याच्या डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी उत्सुक असलेल्या सुप्रसिद्ध मराठी डीजे कृणाल घोरपडे अर्थातच '' डीजे क्रेटेक्स '' यांच्या डीजे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मराठी अजरामर गाण्यांना मिळालेली डीजेची साथ यावर मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणाईने मनसोक्त थिरकून दिवाळी पहाटचा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरवला. तर विविध पारंपरिक वेशभूषा करून आलेले अनेक तरुण - तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी शिवसेनेचे आणि महायुतीचे कल्याण ग्रामीणचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे आणि भाजपा आणि महायुतीचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी देखील यावेळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवा वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला.