मुंबई: विस्तारा एअरलाइन्स सोमवारी विलीनीकरण कराराअंतर्गत शेवटचे उड्डाण करणार आहे. यानंतर त्याचा ताफा एअर इंडिया ग्रुपद्वारे चालवला जाईल. त्याचबरोबर पुढील सर्व बुकिंग देखील एअर इंडियाद्वारेच केले जाईल. ही विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एअर इंडिया ही आता एकमेव पूर्ण सेवा वाहक (FSC) विमान वाहतूक कंपनी असेल.
देशांतर्गत, BOM-DEL, UK986 म्हणून विस्ताराची शेवटची फ्लाइट असेल. ती ११ नोव्हेंबर रोजी मुंबईहून २२:५० वाजता सुटेल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, DEL-SIN, UK115 म्हणून विस्ताराचे शेवटचे उड्डाण असेल. ते ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून २३:४५ वाजता निघेल. विस्तारा फ्लाइट म्हणून टेक ऑफ करणारी ही शेवटची फ्लाइट असेल.
विस्तारामध्ये ४९ टक्के भागीदारी असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सकडे विलीनीकरणानंतर एअर इंडियामध्ये २५.१ टक्के हिस्सा असेल. या विलीनीकरणामुळे, थेट परदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) निकषांच्या उदारीकरणानंतर तयार झालेल्या परदेशी विमान कंपनीच्या संयुक्त मालकीची आणखी एक भारतीय विमान कंपनी असेल. गेल्या १७ वर्षांत, पाच पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी देशातील त्यांच्या सेवांना निरोप दिला आहे.
२०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने परदेशी विमान कंपन्यांना देशांतर्गत विमान कंपनीत ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची परवानगी दिली होती. यानंतर, गल्फ रिजन एअरलाइन एतिहादने आता बंद पडलेल्या जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सा विकत घेतला. दुसरीकडे, AirAsia India आणि Vistara यांचा जन्म झाला.
विस्तारा ही गेल्या १० वर्षात विमान वाहतूक करणारी एकमेव पूर्ण सेवा वाहक आहे. २००७ मध्ये एअर इंडियामध्ये प्रमुख पूर्ण सेवा वाहक (FSC) इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण झाल्यापासून भारतात किमान पाच FSC लाँच करण्यात आले आहेत. मात्र, कालांतराने किंगफिशर आणि एअर सहारा गायब झाले. किंगफिशर २०१२ मध्ये बंद झाली, तर एअर सहारा जेट एअरवेजने विकत घेतले.