भारतीय हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : सध्याचे वातावरण पाहता थंडी येण्यास उशीर होईल असे म्हटले जात असताना भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबरप्रमाने नोव्हेंबरमध्येही हवामान उष्ण राहील, असा अंदाज वर्तवला आहे. अद्याप अनेक राज्यांतून मान्सूनने निरोप घेतला असून साधारणपणे दिवाळीच्या आसपास थंडी जाणवू लागते, मात्र यंदा दिवाळी उलटून गेली तरी थंडी जाणवलेली नाही. दरम्यान, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात हवामान उबदार राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे.
१९०१ नंतर ऑक्टोबर महिना हा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे. सरासरी तापमान १.२३ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, IMD महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पश्चिम विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय कमी दाब प्रणाली नसल्यामुळे पूर्वेकडील भागात उष्ण हवामान असल्याचे स्पष्ट केले. महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये सरासरी तापमान २६.९२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे १९०१ नंतरचे सर्वात उष्ण आहे, तर सामान्य तापमान २५.६९ अंश सेल्सिअस आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम मैदानी भागात पुढील दोन आठवडे तापमान सामान्यपेक्षा २-५ अंशांनी जास्त राहील, त्यानंतर हवामानात हळूहळू बदल होतील.