सोमवारी ठाण्यात पुरोगामी, आंबेडकरी पक्ष संघटनांचा मोर्चा




सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध 


ठाणे : परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अवमानास्पद वक्तव्या निषेधार्थ सोमवारी (दि. ३०) ठाण्यात सर्व पुरोगामी, आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ इंदिसे यांनी सांगितले की, सोमनाथ सुर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. त्यामुळे तो कायदाबाह्य काम करूच शकत नाही. मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबले आणि तिथे केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तसा शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.  तसेच, अमित शहा यांनी लोकसभेत द्वेषातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. याबाबत अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. 



हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता ठाणे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे तलावपाळी येथे शिवरायांना मुजरा करून टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post