दिवा, (आरती परब) : महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या व्यावसायिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन गणपती मंदिर संस्थान हॉल डोंबिवली येथे उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र उद्योग नेटवर्कचे उद्दिष्ट म्हणजे मराठी उद्योजकांना एकत्र आणणे.
मराठी उद्योजकांना एकत्र आणून स्वतःचा व्यवसाय कसा वाढवावा, त्याची प्रसिद्धी कशी करावी याविषयीचे मार्गदर्शन व प्रमोट करण्याची संधी त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक मीटिंगमध्ये केले जाते.
व्यावसायिक मीटिंग म्हणजे स्वतःचा व्यवसाय स्वतः प्रमोट करणे, संस्थेचे संस्थापक धर्मेंद्र नलावडे यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या व्यवसायिक बैठका दादर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळा या सर्व ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. मराठी माणसे हल्ली व्यवसायात उतरत आहेत पण त्यांना आपला व्यवसाय, उद्योग वाढवायचा असेल, त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या कोणत्याही व्यावसायिक बैठकीस हजर राहून अनुभव घ्यावा.
या वर्धापन दिनाला ३० ते ३५ व्यवसाय, उद्योगांच्या मालकांनी हजेरी लावली होती. यात छोट्या छोट्या पण सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक मुद्द्यांवर धर्मेंद्र नलावडे यांनी योग्य मार्गदर्शन केले. प्रत्येकाने फक्त जॉब वर अवलंबून न राहता व्यवसाय, उद्योगामध्ये पडलं पाहिजे. मराठी माणसाने स्वतःची चाकोरी सोडली पाहिजे. अशी सांगून उपस्थितांची नलावडे यांनी मने जिंकली.