प्रकाश पाटीलांच्या आमरण उपोषणाला स्थगिती
दिवा, (आरती परब) : संपूर्ण दिव्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मंगळवारपासून उपोषणाला बसलेले मनसेचे साबे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाचव्या दिवशी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी भेट देऊन आम्ही पाणी चोरांवर कारवाई करू, अशी थातुरमातुर उत्तरे दिल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चिडले. त्यावेळी हा पाणी प्रश्न पालिकेने नीट न सोडविल्यास मनसे कार्यकर्ते येणाऱ्या सोमवारपासून दिवा प्रभाग समितीच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करू अन् त्यानंतर ही प्रश्न सुटला नाही तर थेट ठाणे महानगर पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा सज्जड इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण ठिकाणी सहाय्यक आयुक्त घुगे यांना दिला. त्यावेळी पाचव्या दिवशी प्रकाश पाटील यांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे आमरण उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोसंबी ज्यूस देऊन सोडविले.
दिव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध आंदोलने, उपोषणे, घेऊन दिवेकरांचे प्रश्न, समस्या सोडवत असतात. अनधिकृत बांधकामांचे माहेर घर असणाऱ्या दिव्यात गेली २ ते ३ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होताना दिसतो आहे. दिवेकर रात्री कामावरून आल्यावर पाण्यासाठी कॅन, हंडा, बादली घेऊन पाण्यासाठी वणवण भटकत आहे. काही दिवेकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी पाण्यासाठी भटकण्यापेक्षा विकतचं टँकरचे पाणी झक मारत घ्यावे लागते आहे. ह्याच मुख्य समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनसेचे साबे विभाग प्रमुख प्रकाश पाटील हे मंगळवार पासून दिवा स्टेशन जवळ संपूर्ण दिव्यातील पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाला बसले होते. मात्र प्रकाश पाटील यांचं उपोषण सोडवण्यात दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त घुगे यांना अपयश आले.
त्यांच्या पाणी अभियंत्यांना पाणी चोरीचे ठिकाण दाखवूनही योग्य कारवाई पालिकेकडून होताना दिसत नसल्याने मनसे कार्यकर्ते आणि सामान्य दिवेकर ही चिडले आहेत. त्यामुळे आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण ठिकाणी प्रकाश पाटील यांची भेट घेत पाणी प्रश्न तात्काळ न सोडवला गेल्यास ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात दिव्यात, ठाण्यात, डोंबिवलीत सगळी कडे मोर्चे, जनआंदोलन उभे केले जाईल असा इशाराच दिवा प्रभाग समितीच्या आयुक्तांना दिला. तसेच येणाऱ्या सोमवार पर्यंत पाणी चोरांवर योग्य पोलीस कारवाई पालिका प्रशासनाने न केल्यास दिवा प्रभाग समितीच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये आणि महापालिका मुख्यालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत स्थगित केले.