मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा इशारा
दिवा, (आरती परब) : दिव्यातील साबे गावामधील साळवी नगर येथील रहिवासी यांना निवडणुकीच्या तोंडावर कांदळवनाची नोटीस कशी येते, असा प्रश्न विचारत साबे गावातील काही भाग हा कांदळवन घोषित करून दिव्यातील साधारण दीड ते दोन हजार कुटुंबीयांच्या घरावर कारवाई करून त्यांना बेघर करू पाहणाऱ्या प्रशासनाचा आम्ही सर्वजण निषेध करतो. एकाही सामान्य नागरिकाच्या घराला मी हात लावू देणार नाही, तुम्हाला कारवाईच करायची असल्यास पहिली माझ्यावर कारवाई करा, नंतर घरे तोडा, असा इशारा मनसेचे साबे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कांदळवन घोषित करून नागरिकांना घाबरवून त्यामागे काही राजकारण करण्याचा हेतू असल्याचा सवाल प्रकाश पाटील यांनी नागरिकांसमोर उपस्थित केला आहे. त्याचबरोबर याआधी साळवी नगरचे क्लस्टर सर्वेक्षण झाले असताना आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा कांदळवन सर्वेक्षण कसे, असाही प्रश्न प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला आहे. साबे गावातील दहा ते पंधरा वर्षांपासून डम्पिंग भागात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला निवडणूक काळात मतांसाठी घाबरवण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
नागरिकांना आलेल्या या नोटिसी विरोधात मी नागरिकांसोबत कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही प्रकाश पाटील यांनी सांगितले. दिव्यातील साळवी नगर भागात असणाऱ्या बैठ्या चाळी व परिसराला कांदळवन घोषित केल्याने नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाल्याची चर्चा अलीकडे होती. प्रशासनामार्फत सदर जागेचा माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांना मिळाल्यानंतर नागरिकांच्या बाजूने मनसे मैदानात उतरली असून सर्वसामान्य नागरिकांना बेघर होऊ दिले जाणार नाही असे स्पष्ट मत मनसेचे प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कांदळवन घोषित केलेली जागा ही साबे गावातील गावकऱ्यांची सातबारा असलेली गुरचरण जागा आहे. गावाची लोकसंख्या वाढल्यावर पुढच्या पिढीच्या गरजेपोटी त्या भागात घरे बांधण्यासाठी ती जागा गावकरी ठेवत असतात. या गावठाणाच्या विस्तारासाठी किंवा अन्यकारणाने या भागात घरे बांधली गेली असल्यास आणि सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी वास्तव्याला असल्याने या घरांना प्रशासनाने हात लावू नये. असे ही मनसेचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे. ज्यावेळी येथे घर बांधली गेली. त्यावेळी प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता साधारण दीड ते दोन हजार कुटुंबाचे संसार उध्वस्त करण्याची भूमिका घेतली जाणार असेल तर येथील भूमिपुत्र आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही उभे राहू असे मनसेचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या भागात सर्वेसाठी प्रशासनाचे अधिकारी आल्यास नागरिकांनी आम्हाला कळवावे. लगतचे हिस्सेदार हे खासगी जमिनीचे मालक आहेत. नागरिकांना बेधर करण्याची भूमिका प्रशासनाने घेऊ नय, असेही प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.