अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांचा सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद
डोंबिवली ( शंकर जाधव ) : शहराच्या स्वच्छतेवरुन शहराची प्रतिमा जनमानसापर्यंत पोहचते, त्यामुळे स्वच्छतेचे काम सर्वात महत्वाचे असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज केले. महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये सफाई कर्मचा-यांकरीता आयोजिलेल्या क्षमता बांधणी कार्यशाळेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत उपस्थित सफाई कर्मचा-यांना 'सफाई-मित्र' असे संबोधत, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सफाई कर्मचा-यांशी संवाद साधत आपल्या छोटेखानी भाषणात स्वच्छतेचे महत्व उपस्थित सफाई कर्मचा-यांना पटवून दिले.
स्वच्छ आणि सुंदर रस्ते यांचे श्रेय केवळ सफाई कर्मचा-यांचे असून, सफाई कर्मचा-यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी शिबीर लावावे, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिले. तसेच सेवा विषयक काही विषय असल्यास ते मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
आपले स्वत:चे स्वास्थ चांगले असेल, तर चांगली कामे होऊ शकतील. यासाठीच या कार्यशाळेचे/ प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी यावेळी दिली आणि प्रशिक्षणातील आपले अनुभव, ज्ञान कृतीत आणा असे सांगत स्वच्छतेचे महत्व उपस्थित सफाई कर्मचा-यांसमोर अधोरेखित केले.
दिव्य स्वप्न फाऊंडेशन या संस्थेमार्फत आतापर्यंत डोंबिवलीच्या प्रभागात कार्यरत असणाऱ्या ८०० सफाई कर्मचा-यांना आतापर्यंत क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आता कल्याणमधील सफाई कर्मचा-यांना हे प्रशिक्षण सदर संस्थेमार्फत दिले जात आहे. आजच्या या कार्यशाळेत उत्कृष्ठ सफाई कर्मचा-यांना अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व उपस्थित इतर अधिका-यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पीपीई कीट, मास्क, ग्लोव्हज्, शुज, रिफलेक्टर जॅकेट इ. अंतर्भाव असलेला सुरक्षा संच देवून गौरविण्यात आले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, 'क' प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदिप खिस्मतराव, घनकचरा व्यवस्थापन विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी आणि 'क' प्रभागातील सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होता.