२६ वा स्वामी विवेकानंद पुरस्कार दिलीप वसंत बेतकेकर यांना प्रदान




डोंबिवली ( शंकर जाधव ) :   राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा  २६ वा स्वामी विवेकानंद पुरस्कार विद्याभारतीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री दिलीप वसंत बेतकेकर यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

   यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी ,उपाध्यक्ष विद्याधर शास्त्री,कार्यवाह शिरिष फडके , सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष अमित भावे उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, छत्रपती भवन, आयरे रोड, दत्तनगर येथे पार पडला.

     


    डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरी मधील राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून स्वामी विवेकानंद पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे. डोंबिवलीमधून अनेक परंपरांचा प्रारंभ झाला आहे यामध्ये स्वागत यात्रा.... त्यासारखा हा पुरस्कार देखील आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की आपण कोण आहोत हे जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना विविध अंगी शिक्षण देऊन त्यांना प्रत्येक गोष्टीत निपुण करायचे आहे. 


    आपल्या येथील शिक्षणाच्या स्थितीबद्दल सांगताना आपल्याकडे अभ्यासक्रम १९ व्या शतकातील शिक्षण विसाव्या शतकातील तर विद्यार्थी हे एकविसाव्या शतकामध्ये आहेत. जोपर्यंत यातील दरी आपण भरत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर किंवा सर्वश्रेष्ठ भारत पूर्ण होणं अवघड आहे. हेच प्रयत्न आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधून केले जाणार आहेत. जगातील अनेक विचारवंत भारताकडे अपेक्षेने पाहत आहेत अनेक देशांमध्ये भारताबद्दल आपुलकी वाटणारे नागरिक राहतात.




   परदेशी लेखक डॉक्टर अर्नाय टॉयंबी यांच्यामते ज्या ज्या देशांनी भारतावर राज्य केले, त्या सर्व देशांना भारत देश जिंकेल. म्हणूनच एकविसाव्या शतक हे भारताचे शतक असणार आहे. संस्कृत भाषेविषयी बोलताना मुलांच्या बौद्धिक विकासात संस्कृत भाषेचा फार मोठा वाटा आहे. संस्कृत भाषा ही मृत भाषा नसून अमृत भाषा आहे.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले.यावेळी यावेळी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्था ही ठाणे जिल्ह्यात आपल्या शहराचे नेतृत्व करीत असून येथील विद्यार्थी विविध कला क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करीत आहेत. यापुढे आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांनी राज्याचे नेतृत्व करावे अशा प्रकारचे प्रयत्न करीत आहोत असे म्हटले.  




 सत्कारमूर्तींचा परिचय संस्था सदस्य राजाराम पाटील यांनी करून दिला. सत्कारमूर्तींना देण्यात आलेल्या मानपत्रचे लेखन,वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेतील शिक्षक डॉ. सुनील पांचाळ यांनी केले.आभार उपाध्यक्ष विद्याधर शास्त्री यांनी मानले. स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळा या कार्यक्रम समितीच्या व्यवस्था प्रमुख म्हणून रामचंद्र नगर मराठी माध्यम ,माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला चव्हाण यांनी काम पाहिले.


   पुरस्काराच्या सुरुवातीला विष्णुनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन तर दत्तनगर मध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच विष्णुनगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनी ओवी दत्ताराम मोंडेने कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले. कार्यक्रमाला संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post