अनाथ मुलांमधून आदर्श व्यक्ती घडविण्याचे तर्पण फाउंडेशनचे कार्य जगातील सर्वात श्रेष्ठ कार्य - राम शिंदे


ठाणे, ( दिलीप कालेकर ) अनाथ मुलांमधून आदर्श व्यक्ती घडविण्याचे तर्पण फाउंडेशनचे कार्य जगातील सर्वात श्रेष्ठ कार्य असून अनाथ मुलांबाबत प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधान परिषद सभापती म्हणून मी कटिबद्ध असेन, असे वक्तव्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर्पण युवा पुरस्कार सोहळ्यामध्ये केले.


अनाथालय व बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या अद्वितीय यशाचा व योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी ‘तर्पण युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महिला व बाल विकास विभाग कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे, विधानपरिषदेचे आमदार व तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून वोक्हार्ट लिमिटेड चे कार्यकारी संचालक डॉ. हुजैफा खोरेकीवाला, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि इस्कॉनचे प्रवक्ते नित्यानंद चरणदास उपस्थित होते.


या कार्यक्रमामध्ये सनाथ वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती गायत्री पाठक, स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने आणि श्री संस्कार मतिमंद मुलींचे वसतिगृहच्या अध्यक्षा मंगलताई वाघ यांना सभापती राम शिंदे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तर्पण युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये मुंबईतील गणमान्य लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.


या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले कि, गेल्या ७५ वर्षांत अनाथांना आरक्षण देण्याचा विचार एकाही राजकारण्याच्या मनात आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांना शासनामध्ये नोकरीसाठी एक टक्का आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पण तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आ. श्रीकांत भारतीय यांनी त्या निर्णयाला अनुसरून अनाथ बालकांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांच्यातून एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करण्याचे काम केले. जन्म दिलेल्या मुलांना चांगल्या तर्हेने सांभाळताना पालकांना कसरत करावी लागते. या प्रसंगी महिला व बाल विकास विभाग कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की अनाथालये व बालगृहे यांमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांची वयोमर्यादा आम्ही 18 वर्षांवरून 21 वर्षे करणार आहोत आणि त्याविषयीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे मांडणार आहोत. तसेच म्हाडाच्या सदनिकांमध्ये अनाथ मुलांसाठी राखीव आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव देखील सरकारतर्फे मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यावेळी सभापती राम शिंदे यांनी देखील या प्रस्तावाबाबत पाठिंबा दर्शविला.


या प्रसंगी बोलताना तर्पण फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, अनाथ मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहातून किंवा अनाथालयातून बाहेर काढले जाते. परंतु हीच ती वेळ असते जेव्हा त्यांना भविष्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. मार्गदर्शनाअभावी मुलांना भविष्यात मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा मुलांसाठी आम्ही ३६ जणांनी एकत्र येऊन 'तर्पण फाऊंडेशन'ची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर होताना पाहून अत्यानंद होत आहे. या कार्यक्रमात बालगृहातून बाहेर पडलेली माझी ४०० मुले सहभागी झाली आहेत, जी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. आमच्या संस्थेने चार वर्षांत १ हजार, २६० अनाथ मुलांचे संगोपन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांनी अनाथांना शासनामध्ये नोकरीसाठी एक टक्का आरक्षण लागू केले.




Post a Comment

Previous Post Next Post