विद्यार्थी रमले पोलीस ठाण्यात




देशमुख हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची
 शाहूपुरी पोलीस ठाण्याला भेट

कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) :  खरतर, ती शाळेतील मुलं, विद्यार्थी दुरून पोलिसांना बघितलेले आदर राखणारी, पोलीस हत्यारापासून चारहात लांब राहणारी परंतु, इथे मात्र पोलिसांच्यात मिसळून त्यांच्याजवळ, अवतीभोवती फिरणारी, त्यांची हत्यारे हाताळताना विद्यार्थी वर्ग दिसला. कायदा म्हणजे काय, सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय हे ऐकत होती.यातून भविष्यात आपणाला काय घडायचे आहे, पोलिसांचे कर्तव्य काय?नि पोलीस आपल्यासाठी काय करतात, कसे धाडस करतात. हेच सर्व काही जवळून जाणून घ्यायची इच्छा या मुलांना होती, तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी देखील मन लावून या साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देत होते. निमित्त होते,पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे. या विशेष उपक्रमात अनेक शाळांना सहभागी करून घेत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना आपलेसे पोलीस मित्र करत होते.


 पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशान्वये पोलीस दलाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना पोलीस दलाबाबत माहिती देऊन त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या अनुषंगाने विविध उपक्रम घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. 



त्याच अनुषंगाने गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे संतोष डोके, पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख हायस्कूल यांच्याकडील इयत्ता आठवी व नववीमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना शाहुपुरी पोलीस ठाणे येथे बोलावून पोलीस दलाचे कामकाज कसे चालते, पोलीस ठाणे मध्ये कोणकोणते विभाग कार्यरत आहेत. त्यांचे कार्य प्रणाली काय आहे. महिलांच्या, मुलींच्या तक्रारीबाबत कसे काम करते. नागरिकांना अडचणी आल्यावर त्यांनी काय करावे. याची तसेच पोलीस दलामध्ये असणाऱ्या शस्त्राची, क्राइम ,बारनिशी, समन्स वॉरंट डिटेक्शन ब्रांच, सी.सी.टी.एन.एस , वायरलेस,ठाणे अमलदार, गोपनीय विभाग यांची तसेच लहान मुलांचे बाबतचे वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम,सायबर फ्रॉड, पोकसो कायदा ,याबाबत पोलीस अंमलदार चेतन घाटगे यानी माहिती दिली.




यावेळी पोलीस उपनिरीक्षक रजपूत, सहा. फौजदार शंकर कोळी, पोलिस हवलदार नितीन सावंत, पोलीस आमलदार जलराज देसाई, ऋतुजा सावंत ,मनीषा मोगल, यांच्यासह देशमुख हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post