मुजोर आरोपीवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे

  


आमदार राजेश मोरे यांचा डायघर पोलिसांना इशारा


दिवा, (आरती परब) : मुंब्र्यात फळ विक्रेत्याला मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पडणाऱ्या जमावा विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा तसेच रस्त्याच्या कडेला असलेला अनधिकृत स्टॉ
ल हटविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर मागून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीवर देखील कारवाई होत नसल्याने काल शनिवारी या भागाचे आमदार राजेश मोरे यांनी डायघर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिसाची भेट घेतली. तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले व महाराष्ट्रात मराठीचा मान न ठेवणाऱ्या संबंधित व्यक्तींवर सक्त कारवाई करा, असे आदेश दिले. या दोन्ही घटना गंभीर असून यातील दोषीवर कारवाई कधी पर्यंत केली जाणार असा जाब आमदार मोरे यांनी पोलिसांना विचारला. तसेच या आरोपींवर कडक कारवाई करत त्यांना कायद्याचा धाक दाखवा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.

मुंब्रा शहरात फळ विक्रेत्याला मराठीतून बोलण्यास सांगितल्याच्या रागातून फळ विक्रेत्यासह जमावाने या तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले होते. याचा व्हीडोओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसाकडून याप्रकरणात कारवाई करण्यात आलेली नसल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी आमदार मोरे यांच्याकडे केली होती, म्हणून त्याबाबतीत त्यांनी मुंब्रा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तर अनधिकृत स्टोल हटविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर मागून हल्ला करत त्याला जखमी केल्यानंतरही संबधित आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने आमदार मोरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना या आरोपीची केवळ चौकशी सुरु करण्यात आली आहे. यातून आरोपींना गुन्हा करण्याचे मनोधैर्य वाढेल म्हणूनच ही प्रवृत्ती वेळीच रोखण्यासाठी या आरोपीवर तातडीने कारवाई करा असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत भोईर, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, रोहिदास म्हात्रे विभागप्रमुख किसन जाधव, रमेश काटे, उपविभागप्रमुख भरत काळू भोईर, दिपेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post