अलिबाग,( धनंजय कवठेकर ) : अलिबाग लायन्स अलिबाग आणि परिसरामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवते. क्लबने आजवर यशस्वी ५० वर्षे पूर्ण करुन ५१व्या वर्षात पदार्पण केले आहे. एखाद्या संस्थेने एवढ्या मोठ्या कालावधीसाठी अखंडितपणे काम करणे हे खरंतर संस्थेच्या यशाचे द्योतक आहे. लायन्स क्लबच्या इतर अनेक महत्तवपूर्ण उपक्रमांपैकी लायन्स फेस्टिवल हा अलिबागकरांसाठी आकर्षणाचा विषय. अलिबागच नाही तर अलिबागबाहेरील अर्थात जिल्हाच्या सीमा ओलांडून उद्योजकांना उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा व्यापारी उत्सव ! फेस्टिवलला भेट देणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वस्तू एकाच छताखाली मिळण्यासाठी मागील १८ वर्षे 'लायन्स अलिबाग फेस्टिवलचे' आयोजन केले जाते. अलिबागकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे यावर्षी १८वा लायन्स फेस्टिवल साजरा करणे शक्य होत आहे असे प्रतिपादन महोत्सव समितीचे अध्यक्ष नयन कवळे यांनी केले . प्रतिवर्षीप्रमाणे हा महोत्सव २३ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत अलिबागच्या समुद्रकिनारी भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येत आहे. व्यावसायिकांसह ग्राहकांसाठी हा महोत्सव नावीन्यपूर्ण असेल.
विविध स्टॉल्सचे प्रकार
हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टाॅल्स, जागतिक बाजारपेठेतील नामांकित ब्रँड्स असलेल्या श्रीमती मीनल मोहाडीकर यांच्या 'कंझ्युमर शॉपी' या संस्थेबरोबरील सहकार्याने या महोत्सवामध्ये१७० हून अधिक स्टॉल्स ग्राहकांच्या सेवेत असणार आहेत. चटकदार व्हेज ,नॉनव्हेज तसेच खाद्यपदार्थांचे ५०हून अधिक स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. उत्तमोत्तम ,दर्जेदार आणि नवेपण घेऊन आलेल्या वस्तूंची उपलब्धता हे फेस्टिवलचे वैशिष्ट्य आहे. मान्यताप्राप्त सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, नामांकित ज्वेलर्स , सालीटेयर इव्हेंट यांचे नामांकित चारचाकी ,दुचाकी वाहनांचे प्रदर्शन आणि विक्री हेसुद्धा या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
सांस्कृतिक मेजवानी
गुरुवार, २३ जानेवारी कराओके स्पर्धा, शुक्रवार, २४जानेवारी शरीरसौष्ठव स्पर्धा आणि पेट शो, शनिवार, २५जानेवारी बौद्धिक क्षमता विकसित करणारा अलिबाग लायन्स टॅलंन्ट हंट कार्यक्रम, रविवार ,२६जानेवारी इंडियन आयडॉल नामांकित अभिनेत्री श्वेता दांडेकर संगीत रजनी , सोमवार, २७ जानेवारी 'इंडि-सा ' हिंदी बँड असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होऊन या महोत्सवाची शान वाढवणार आहेत. लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा, नेत्रदान, अवयवदान, देहदान यांचा प्रचार आणि प्रसाराचे कामही महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
फेस्टिवल सोहळ्याचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६:००वाजता लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर ला पंकज मेहता, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रांतपाल एन आर परमेश्वरन, प्रथम प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. तर या शानदार फेस्टीवलचा सांगता सोहळा अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. या संपूर्ण दिमाखदार सोहळ्याला मा खासदार सुनीलजी तटकरे , आदितीताई तटकरे, रायगड जिल्हाधिकारी डॉ किशन जावळे, ॲड आस्वाद पाटील,ॲड प्रवीण ठाकूर, पीएनपी कार्यवाह चित्रलेखा पाटील, जेएसएम अध्यक्ष गौतम पाटील, नृपाल पाटील, लायन्सचे प्रांतपाल एन आर परमेश्वरन, प्रथम प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे ,उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, आरडीसीसी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक , अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी आणि सर्व अधिकारी आदी अनेक मान्यवर महोत्सवादरम्यान भेट देणार आहेत.
फेस्टिवलसाठी झटणारा लायन परिवार
यावर्षीच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष नयन कवळे असून ला अनिल म्हात्रे यांचा पुढाकार आणि संकल्पनेतून अलिबागच्या पहिल्या लायन्स फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते . प्रवीण सरनाईक, संजय पाटील, प्रदीप नाईक, भगवान मालपाणी, परेश भतेजा, अविनाश राऊळ, प्रियदर्शनी पाटील, संतोष पाटील, रणजीत जैन, शशिकांत सोनी, महेंद्र पाटील, गिरीश म्हात्रे, रमेश धनावडे, रोहन पाटील, ॲड गौरी म्हात्रे, महेश कवळे, अंकिता म्हात्रे, नितीन शेडगे, अभिजित आमले, संजय मोरणकर असे अनेक पदाधिकारी लायन्स सदस्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
या महोत्सवातून प्राप्त होणारा निधी विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी विशेषत: लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी केला जातो. लायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून पंचवीस हजार स्क्वेअर फिट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम चोरोंडे-अलिबाग येथे सुरू झाले आहे. त्याकरिता मोठ्या निधीची आवश्यकता असून रायगड जिल्हा सहकारी बँक, आदर्श नागरी सहकारी पतपेढी, सीएफटीआय, सेंट्रल बँक अशा अनेक संस्थांचे सहकार्य फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी होत असते. संपूर्ण लायन्स तसेच डायमंड अलिबाग, मांडवा, पोयनाड, श्रीबाग सेंटेनियल क्लब, नागाव क्लब परिवार आणि तालुक्यातील सर्व लायन सदस्य महोत्सव यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या सर्वांच्या मेहनतीमुळे हा फेस्टिवल यशस्वी होईल, अशी खात्री ला नयन कवळे व ला अनिल म्हात्रे यांनी दिली. अलिबागमधील ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून हा फेस्टिवल यशस्वी करावा ,असे आवाहन अलिबाग लायन्स क्लबच्या अध्यक्ष ॲड गौरी म्हात्रे आणि फेस्टिवल समितीचे अध्यक्ष नयन कवळे यांनी केले.