मुंबई : महाकुंभ मेळाव्यास आजपासून सुरुवात होणार असून त्यादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस (BDTS) आणि ते गोरखपूर अशी नवीन सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही साप्ताहिक ट्रेन अनारक्षित असेल आणि विशेष भाडे आकारले जाईल.
ट्रेन क्रमांक ०५०५४ वांद्रे टर्मिनस-गोरखपूर स्पेशल वांद्रे टर्मिनस आठवड्यातून एकदा शनिवारी २१.२० वाजता सुटेल आणि सोमवारी ६.४५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही ट्रेन १५ फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०५०५३ गोरखपूर-वांद्रे टर्मिनस स्पेशल गोरखपूरहून आठवड्यातून एकदा शुक्रवारी ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १४ फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहे.
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन या स्थानकांवर थांबेल – बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, कोटा, गंगापूर सिटी, बयाना, आग्रा फोर्ट, तुंडला, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाह नगर, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद. या अनारक्षित ट्रेनला द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.
अहमदाबाद-जंघाई, राजकोट-बनारस आणि वेरावळ-बनारस स्थानकांदरम्यान विशेष भाड्यावर तीन जोड्या महाकुंभ मेळा विशेष गाड्या चालवत आहे. यामध्ये ०९४०३/०९४०४ अहमदाबाद - जंघाई महाकुंभ मेळा विशेष (१८ सहली), ०९५३७/०९५३८ राजकोट-बनारस महाकुंभ मेळा विशेष (०६ सहली), ०९५९१/०९५९२ वेरावळ-बनारस महाकुंभ मेळा विशेष (०२ सहली) यांचा समावेश आहे. त्याचवेळी, मध्य रेल्वेने कुंभसाठी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.