इयत्ता दहावी, बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करा

Maharashtra WebNews
0



जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

भरारी पथकांच्या माहितीसाठी क्यू आर कोडवर आधारीत पॉकेट डायरी

कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पथके तैनात


कोल्हापूर,  (शेखर धोगडे ): इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन करुन कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. 


     जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान १०० टक्के यशस्वी राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रांच्या माहितीवर आधारीत पॉकेट डायरीचे प्रकाशन जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते झाले. 


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावी बारावी परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या माहितीवर आधारित पॉकेट डायरी तयार करण्यात आली आहे. डायरीमध्ये असणारा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर यात परीक्षा केंद्रांचे स्थळ व अन्य आवश्यक माहिती मिळणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या अनुषंगाने त्या त्या परीक्षा केंद्रांची सर्व माहिती भरारी पथकांना मिळणार असल्यामुळे परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल.




    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे तपासणी पथक तैनात ठेवा. फिरत्या भरारी पथकाने परिणामकारक तपासणी करावी. प्रत्येक परीक्षा केंद्र स्थळावरील सोयीसुविधा व याठिकाणी कॉपी करण्यासाठी असलेले छुपे मार्ग याबाबतची माहिती भरारी पथकांना द्या.  संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा. तसेच अशा केंद्रांना भरारी पथकांनी वारंवार भेटी द्याव्यात. परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्यांव्दारे चित्रीकरण करा. नियंत्रण कक्षाद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवर वॉच ठेवावा. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर अनुचित अथवा गैरप्रकार आढळून आल्यास दक्षता समितीने संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.


 भरारी पथकातील कर्मचारी आणि संबंधित अधिकारी यांनी रँडम पद्धतीने भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तालुका मुख्यालयापासून दूर असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून तपासणी करा. केंद्राजवळील सर्व झेरॉक्स दुकाने त्या काळात बंद राहतील याची दक्षता घ्या. सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या भौतिक सुविधा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.


   दोन्ही परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडा. कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारीत येडगे यांनी केले. एकनाथ आंबोकर यांनी परीक्षांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उप शिक्षणाधिकारी गजानन उकिरडे, अजय पाटील, दिगंबर मोरे, विस्तार अधिकारी जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे आदी उपस्थित होते. 

     

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)