दिव्यातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा




शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दिवा, ( आरती परब ) : दिव्यातील बेडेकर नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव व प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापन दिन या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
शिवजन्मोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या नयनरम्य देखाव्याचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले, त्यासाठी मेहनत घेणारे मावळे विनायक शेडकर, दिलीप पांचाळ, प्रमोद भोवड, महेश पांचाळ, तसेच सोबत असलेल्या संपूर्ण टीमचे आभार मानून सर्वांचा सन्मान प्रतिष्ठान कडून करण्यात आला. शिस्तबध्द शिवज्योत रॅली, विविध शिवज्योत रॅलींचे स्वागत आणि सन्मान, प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा तसेच सुस्वर संगीत भजन, असे विविध कार्यक्रम सकाळच्या सत्रात पार पडले. 


सायंकाळी भव्य शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक, त्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी देऊन उपस्थित महिलांचाही सन्मान प्रतिष्ठानकडून करण्यात आला. रात्री २५०० शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.  उत्तम असे आयोजन आणि नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरळ आणि कार्याध्यक्ष विनोद घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पाहण्यास मिळाले. 



रात्री १० वाजता दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही बेडेकर नगरच्या नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तरळ यांनी याचे सर्व श्रेय प्रतिष्ठानच्या सभासद तसेच महिला सभासदांना दिले.


या उत्सवा, कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरळ, कार्याध्यक्ष विनोद घाग, उपाध्यक्ष सोपान जाधव, सचिव वैभव पवार, सह सचिव योगेश आमटे, खजिनदार योगेश बेंद्रे, सह खजिनदार समीर माने, दत्ता चव्हाण, मच्छिंद्र सकपाळ, सल्लागार राजन सकपाळ, प्रमोद भोवड, तानाजी पवार, महेश खडतर, राजू फके, दिनेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे चाळ प्रतिनिधी व सर्व सभासदांनी महिनाभर अथक मेहनत घेतली.





Post a Comment

Previous Post Next Post