यूपीएससी भवन व मोरिवली शाळेने पटकावली ' फिरती ढाल'

 



अंबरनाथ नगरपरिषद शाळांचा आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

अंबरनाथ/अशोक नाईक : दरवर्षी शालेय क्रीडा महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना सादर करण्याची एक पर्वणीच असते. शारीरिक तंदुरुस्तीबरोबर दृढनिश्चय, शिस्त आणि समर्पणाचा हा उत्सव अंबरनाथ नगरपरिषद अंतर्गत शिक्षण विभागामार्फत मोरिवली शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. चार दिवसीय आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी सभापती सुभाष साळुंके यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून झाले. यावेळी प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे, शिक्षण विभाग प्रमुख दिपाली बोडके, क्रीडा प्रमुख, उपप्रमुख, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेच्या १७ शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवात भाग घेतला होता. दरम्यान १५ फेब्रुवारी शनिवारी या आंतरशालेय क्रीडा महोत्सची सांगता व बक्षीस वितरण सोहळा प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आंतरशालेय क्रीडा महोत्सवात सात प्रकारचे वैयक्तिक खेळ तर चार प्रकारचे सांगतीक खेळ खेळवण्यात आले. कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे, दोरी उड्या, चमचा लिंबू,बटाटा शर्यत अशा स्पर्धात्मक खेळात विद्यार्थ्यांनी मोठा उत्साहात सहभाग घेतला. 


मुलांची 'फिरती ढाल' अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्र. १७ यूपीएससी भवन यांनी पटकावली, तर मुलींची 'फिरती ढाल'नगरपरिषद शाळा क्र.१६ मोरीवली शाळेने जिंकली. सदर आंतरशालेय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रमुख वाल्मीक जाधव, उपप्रमुख शंकर वाघ, केंद्र समन्वयक शेषमल राठोड, संगीता मोरे, डॉ. भारती झोपे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन दीपक नारखेडे व सुनील पाटील यांनी उत्तम प्रकारे केले. या चार दिवसीय आंतरशालेय क्रीडा महोत्सवात वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा प्रमुख, उपप्रमुख आणि शिक्षकांनी शिस्तबद्ध नियोजन केल्याचे दिसून आले. तसेच मुलांमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचा आनंद मनाला भारावून गेल्याची भावना प्रशासक जयश्री धायगुडे यांनी व्यक्त केली.बक्षीस वितरण सोहळ्यानंतर मुलांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत, 'जिंकला तोही विजयी आणि जो हारला तोही विजयी... असा जयघोष करत आमच्या मोरीवली शाळेला मात्र विसरू नका असा स्वाभिमान विद्यार्थ्यांनी जागृत केला.



पहिली ते पाचवीपर्यंत गणित विषय आणि सहावी सातवी आणि आठवी ते गणित आणि विज्ञान विषय इंग्रजीत शिकविण्याकरिता कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची सोय करून घेणार आहोत. त्यासाठी परवानगी मिळालेली आहे. प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि मुख्याधिकारी अभिषेक पराडकर हे परिषदेच्या शाळांमध्ये सोयी सुविधांसाठी सकारात्मक आहेत. खोपोली, महाडमध्ये मराठी शाळांमधील पटसंख्या वाढवणत मला यश आलं. यासाठी पालकांशी संवाद साधला. मातृभाषेत शिकून काय शिक्षण मिळते, तो विषय पटवून मांडल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, शासकीय मराठी शाळेत एकही रुपया फी नाही, मुलांन फक्त दप्तर घेऊन यायचंय, ते देखील पालिका देते, पोषक आहार आहे.लांबच्या मुलांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा प्रवास भत्ता मिळतो, त्यामुळे ८० वरून मुलांची पटसंख्या १५०‌वर गेली. पटसंखेवरून शिक्षक संख्या मंजूर होत असते. सेमी इंग्रजीमुळे मराठी शाळांकडे हळूहळू कल वाढू लागला आहे. शासकीय शाळा जोपर्यंत भौतिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत पालकांचा सरकारी शाळांकडे ओघ लागणार नाही. मात्र अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळा अद्ययावत मार्गावर आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या धर्तीवर हायटेक होत असल्याची प्रतिक्रिया प्रशासक जयश्री धायगुडे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post