महाराष्ट्राच्या अस्मितेचा शिवसेनेचा बुलंद नारा कायम गुंजत ठेवा


खासदार नरेश म्हस्के यांचे पदाधिकारी, कार्यकत्यांना आवाहन 


नवी मुंबई : शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून, ती एक विचारधारा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद नारा आहे. हाच नारा पुढील महानगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून कायम गुंजत ठेवला पाहिजे असे सांगून खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावर कार्यकर्त्यांनी यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. सदर मेळाव्यास कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती.





ऐरोली येथे नवी मुंबई विभागातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेना शाखेचे प्रमुख यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात उपनेते म्हणून निवड झालेले विजय चौगुले आणि ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेले द्वारकानाथ भोईर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार म्हस्के यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, तेव्हा पक्षाकडे सत्ता नव्हती, नगरसेवक नव्हते, पण विचारधारा होती, जोश होता, आणि सर्वसामान्य मराठी माणसासाठी संघर्ष करण्याची जिद्द होती असे सांगत आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक जोमाने पुढे जात आहे.  महाराष्ट्राच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यानी घेतलेल्या निर्णयांची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचवावी. हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. संघटनात्मक बळ वाढवण्यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेच्या समस्या ऐकाव्यात, त्यावर तोडगा काढावा आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सक्रिय राहावे. त्याचप्रमाणे स्वार्थासाठी नाही, तर पक्षाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन खासदार म्हस्के यांनी उपस्थितांना केले. 




पक्षाच्या भवितव्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे हीच जबाबदारी ओळखून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सेनापतीसारखे कार्य केले पाहिजे. सेनापती हा केवळ स्वतःच्या विजयासाठी लढत नाही, तर संपूर्ण सैन्याच्या आणि आपल्या प्रदेशाच्या सुरक्षेसाठी झुंजतो. म्हणूनच प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या चोख बजावून संघटनेच्या विस्तारासाठी झटले पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्या ही सेनापतीप्रमाणे पार पाडा. ज्याच्या मागे संघटनाशक्ती असते, जो आपल्या क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन चालतो, तोच खऱ्या अर्थाने एक नेता असल्याचे सांगत खासदार म्हस्के यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. 





#nareshmhaske #ShivSena #EknathShinde #NaviMumbai

Post a Comment

Previous Post Next Post