मुंबई : महिला अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दिमाखदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर मोहोर उमटवली. या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंचा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. सानिका विनोद चाळके (फलंदाज आणि उपकर्णधार), भाविका मनोजकुमार अहिरे (फलंदाज आणि विकेटकिपर) आणि ईश्वरी मोरेश्वर अवसरे (ऑलराउंडर) यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव म्हणून मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह आमदार प्रसाद लाड तसेच खेळाडूंचे पालकही उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्याशी संवाद साधला. सानिका, भाविका आणि ईश्वरी यांनी दाखवलेली उत्तम कामगिरी महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. महिला क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी भक्कम पायाभरणी केली आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असून आहे.