शनिवारी कलशयात्रा तर रविवारी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा
दिवा, (आरती परब) : श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व दिवा ग्रामस्थ यांच्यावतीने श्री गणेश, श्री हनुमान, श्रीराम, लक्ष्मण, सीता या देवतांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक शुक्रवारी सकाळी संपूर्ण दिवा गावातून काढण्यात आली. तसेच सर्व देवांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा तसेच श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार सोहळा रविवारी संपन्न होणार आहे. तर या तीन दिवसीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली.
या सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळपासून देवांच्या सर्व मूर्तींची मिरवणूक मोठ्या उत्साहात वाजत गाजत नागरिकांच्या हजेरीत पार पडली. हनुमान मंदिर - कुलस्वामिनी मंदिर गावदेवी मंदिर हनुमान मंदिर अशी ही मूर्ती मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. गाव प्रदक्षिणा घालून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरात मूर्ती मिरवणूक सोहळा समाप्त झाला. यावेळी दिवा ग्रामस्थ, महिला- भगिनी तरुण- तरुणी, बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात देवतांच्या मूर्तीचा हा मिरवणूक सोहळा पार पडला. तर या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तीनही दिवशी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व दिवा ग्रामस्थ यांच्या वतीने केलेले आहे. त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ व दिवा ग्रामस्थ यांनी केले आहे.