डोंबिवल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ५९ व्या आत्म समर्पण दिन नुकताच डोंबिवली येथे संपन्न झाला. यानिमित्ताने 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान'च्या वतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीतांचा प्रकाशन सोहळा पार पडला. वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून डोंबिवली येथील ब्लॉसम शाळेच्या सभागृहात सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने 'हिंदू सामर्थ्य गीत' या स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीतांचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान'चे अध्यक्ष भिकूजी (दादा) इदाते, 'महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळा'चे सभापती रविंद्र माधव साठे, संगीतकार श्रीधर फडके यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, त्यांचे साहित्य हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे बाबूजींनी (सुधीर फडके) ठरवले आणि तेव्हा त्यांनी सावरकरांचे विचार, त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूल या शाळेच्या प्रांगणातून केली. त्या गोष्टीची आठवण म्हणून आताही माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम स. वा. जोशी हायस्कूलच्या ब्लॉसम शाळेच्या ऑडिटोरियममध्येच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सावरकरांवरील बाबूजींची गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातून देशभक्तीचे एक वेगळेच वातावरण तयार झाले होते.