पाणी कपातीचा निर्णय १५ एप्रिलनंतर घेण्याची शक्यता ?
अंबरनाथ \ अशोक नाईक : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात १० एप्रिल रोजी फक्त ४५.४६ टक्के पाणीसाठा असल्याने १५ एप्रिलनंतर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान मागील वर्षी १० एप्रिल रोजी ४४.६२ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बारवी धरणातील पाणीसाठा एक टक्क्यांनी जरी जास्त असला, तरीही संचय पाणीसाठा जून अखेर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी साठ्याचे नियोजन एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाला करावा लागणार आहे.
ठाणे, नवी मुंबई, मीरा -भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसह ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत एक टक्का पाणीसाठा जास्त आहे. दरम्यान १५ एप्रिलनंतर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यव टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.