अमृत २.० योजनेचा सहा कोटी निधी मिळूनही तलावाचे काम अपूर्ण
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील दातिवली तलाव हा दिवा शहरातील प्रमुख तलाव असून येथे गणेश विसर्जन व दुर्गा मातेचे विसर्जन केले जाते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास दातिवली तलावाची कठड्याची भिंत पडली. त्यावेळी तेथे उभी असलेली एक रिक्षा, एक बाईक तलावात कोसळली. गेली दोन ते तीन वर्षांपासून या दातिवली तलावाचे सुशोभीकरणाचे काम रखडलेले असून त्या कामाची दोन वेळा डेडलाईन देऊनही काम पूर्ण झालेले नाही. या तलावाचे काम अतिशय कासव गतीने काम सुरु असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही तलावाची भिंती कोसळल्याची माहिती मिळताच दिव्यातील ठाकरेंची शिवसेना आक्रमक होऊन पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत तलावाच्या थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करुन ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी केली आहे.
या तलावाला केंद्रशासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तलाव, सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत दातिवली तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी आयुक्तांच्या मान्यतेने ५,७३,२३,८७६ खर्चाची शिफारस करण्यात आली आहे. या कामास महासभा महापालिका फंडातून करावयाच्या खर्चाचे दायित्व स्वीकृतीस मान्यता घेण्यात आली आहे. सदर सुशोभीकरणचे काम यु.सी.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. परंतु सदर तलावाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे चालू असून या संदर्भात वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रार करण्यात आली होती.
परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सुमारास दातिवली तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने त्यात रिक्षा व मोटारसायकल देखील खाली कोसळल्या, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु संरक्षण भिंत कोसळल्यामुळे दिवा आगासन या मुख्य रस्त्याचा काही भाग खचला गेल्याने तेथे त्यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे व सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. सदर कामाची पाहणी दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग प्रमुख नागेश पवार, शनिदास पाटील, रवी रसाल, उपविभाग प्रमुख योगेश निकम, संदीप राऊत, सतीश मांढरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्याच्या दातिवली तलावाची भिंत कोसळल्याने तेथे असलेल्या गाड्यांचे नुकसान