पहलगाममधील दहशतवादी घटनेचा निषेध
अंबरनाथ/ अशोक नाईक : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या घृणास्पद आणि भ्याड कृत्याच्या निषेधार्थ अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसने सोमवार २८ एप्रिल रोजी 'अंबरनाथ बंद' ची हाक दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.बंदची घोषणा करताना, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अधिवक्ता कृष्णा रसाळ-पाटील म्हणाले की, दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, आणि त्या निषेधार्थ सोमवारी अंबरनाथ बंदची घोषणा करत आहोत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी भारत सरकारला आवाहन केले की, अशा भयानक दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, रिक्षा संघटना, हॉटेल असोसिएशन, कामगार आघाडी, अंबरनाथ व्यापारी संघटना, माथाडी कामगार संघटना इत्यादींना कळवले आहे. क्रूर घटनेच्या निषेधार्थ 'अंबरनाथ बंद'ला पाठिंबा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.