माजी आमदार नरेंद्र पवार यांचा व्यवस्थापनाला इशारा
अंबरनाथ \ अशोक नाईक : मिरॅकल केबल कंपनीतून कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना व्यवस्थापनाने त्वरित कामावर घेतले नाही तर उग्र आंदोलन छेडावे लागेल. प्रसंगी 'अंबरनाथ बंद' पुकारल जाईल असा असा इशारा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला यांनी
अंबरनाथ पूर्व आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील मिरॅकल केबल कंपनीने गेल्या २० वर्षांपाहून अधिक काळ काम केलेल्या २६० कामगारांना कोणतीही नोटीस न देता अचानक कामावरून तडकाफडकी काढून टाकले. या कंपनी व्यवस्थापनाच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीसमोर गेल्या ५२ दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे.तरीही व्यवस्थापनाने कार्यवाही केलेली नाही.
कामावरून काढून कामगारांना न्याय मिळावा यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र परिश्रम संघटनेच्या माध्यमातून आज सोमवार (२८) एप्रिल रोजी कामगारांना भेट दिली. आणि झालेल्या द्वारसभेत कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरीचा तीव्र शब्दात निषेध केला.
कंपनीतील २६० कामगारांना काढून टाकणे अयोग्य असून व्यवस्थापनाने रीतसर बोलणी टाळली आहे. व्यवस्थापना विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी बोलणी झाली आहेत. सर्वपक्षीयांनी कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी करत भाजपला पाठिंबा दिला आहे. कंपनीत कामगार कायद्याची पायमल्ली होत आहे , सर्वपक्षीयांचा पाठींबा असूनही मुजोर व्यवस्थापन जुमानत नसल्याने व्यवस्थापना विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र परिश्रम संघ संघटनेचे सचिव दिलीप कुमार मुंडे यांनीही कामगारांच्या व्यथा मांडल्या. पोलीस कामगारांना सहकार्य करत नसल्याचाही रोष व्यक्त केला.
कंपनीमध्ये गेली अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना काढून टाकून स्थानिक आणि मराठींना प्राधान्य न देता अन्य राज्यातील कामगारांद्वारे कंपनी आणि पोलिसांनी उत्पादन सुरु ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल असेही महाराष्ट्र परिश्रम संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला ठणकावले आहे.
गेल्या ५२ दिवसांपासून भर उन्हात कंपनी बाहेर कामगारांचे आंदोलन सुरु आहे, महिला कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे, मात्र व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही, हाऊस किपिगच्या नावाखाली कामगारांकडून उत्पादन प्रक्रिया सुरू आहे. कामगारांच्या मागण्या वेळीच मान्य कराव्या अन्यथा आंदोलनाची धार वाढवली जाईल असे कामगार संघटनेचे सचिव दिलीपकुमार मुंडे म्हणाले. कंपनीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांचे ओळखपत्र तपासणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले - पाटील यांनी अंबरनाथमधील ढासळती कायदा सुव्यवस्था बाबत पोलिसांची भूमिका आणि कामगार विरोधी भूमिका याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांना न्याय दिला नाही तर अंबरनाथ बंद पुकारले जाईल असा इशारा त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना दिला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रजेस तेलंगे, लक्ष्मण पंत, दिलीप कणसे, राजेंद्र कुलकर्णी, आतिश पाटील, दीपक कोतेकर, ओमकार काळे, विजय सुर्वे,सुनिता लयाल,सुरेखा शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगारांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. कामगारांनी कंपनीच्या गेटवर कंपनी व्यवस्थापना विरोधात जोरदार घोषणा दिल्या.