वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
पुणे : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला, शासनाला लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता ठोस कारवाई करून दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करा, असा सल्ला दिला.
तुम्ही एवढी हत्यारे विकत घेता, पाणबुड्या घेता, जहाजे निर्माण करता. पण, त्या सगळ्यांचा उपयोग काय? पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही ठोस ॲक्शन घेणार आहात का? कागदी घोडे नाचवणे थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? जे काही दिसते, त्याला आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. पण निर्णय घेण्याची राजकीय कमतरता दिसून येत आहे, म्हणूनच राज्यकर्त्यांनी काय तो एकदाचा निर्णय घ्यावा. सरकारला, शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक नक्कीच शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील अशी भावना आंबेडकर यांनी व्यक्त केली.
दहशतवादाविरोधात विविध देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. तरीसुद्धा कारवाई होत नाही, माझे नेहमी म्हणणे असते. युद्ध करणे वा न करणे हा भाग वेगळा. पण जिथे हशतवाद्यांची टेनिंग सेंटर्स आहेत, ती उद्ध्वस्त केली पाहिजेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत. अशा वेळी तुम्हाला ते काय करतात? याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? याचा पहिल्यांदा विचार होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी करार स्थगित करणार, मग नद्यांचे पाणी वापरणार कसे, अडवणार कसे, याचेही उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी मारली, यावर काही नागरिकांचा होकार आहे तर काहींचा नकार आहे. असे असले तरी काही राजकीय नेते नरेटिव्ह सेट करत असल्याचे जाणवत आहे. या हल्ल्यात मरण पावले ते भारतीय होते, असे असताना देखील पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहत नाहीत यावरून ते किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. मी बैठकीत असतो, तर वॉक आऊट केले असते. सरकारने पर्यटकांना बाहेर काढण्याऐवजी त्यांना सपोर्ट करणे गरजेचे होते. खर तर पर्यटकांच्या मनात भीती सुरक्षा मिळणार की नाही ? ही भीती असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.