कागल तालुक्याच्या बीरदेव डोणे यांनी परिस्थितीवर मात करत यश संपादन केले
यमगे ( कोल्हापूर) : संकटांचा सामना करत, परिस्थितीशी दोन हात करत आणि जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न बीरदेव सिद्धाप्पा डोणे याने पूर्ण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या या तरुणाने UPSC २०२५ परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवून भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या यशाने केवळ यमगेच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अभिमानाने फुलून गेला आहे. त्यांच्या यशाचे सगळीकडे चर्चा होत आहे.
बीरदेव डोणे यांचे वडील सिद्धाप्पा डोणे हे पारंपरिक मेंढपाळाचा व्यवसाय करतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून, लहानपणापासूनच बीरदेव यांनी मेंढ्या राखताना शिक्षणाची गोडी जपली. शिक्षणासाठी संघर्ष करत त्यांनी यमगे येथील विद्यामंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, तर जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
पुढे मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमधून विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्यांनी आपल्या केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर पुण्यातील प्रतिष्ठित COEP (College of Engineering Pune) या महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) ची पदवी घेतली.
बीरदेवने UPSC परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना केला. दोन वर्षे त्यांनी दिल्लीमध्ये राहून स्वअभ्यास केला.
२०२२ मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले. २०२३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात केवळ ३ गुणांनी मेन्स परीक्षेत अपयशी ठरले. अखेर २०२४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ५५१ वा क्रमांक मिळवत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
UPSC चा निकाल लागला तेव्हा बीरदेव मामाच्या गावी, बेळगाव जिल्ह्यात, मेंढ्या राखत होते. तेव्हा मित्राचा फोन आला आणि या यशाची गोड बातमी समजली. त्या क्षणी, मेंढपाळाचा साधा मुलगा देशाच्या सेवेसाठी अधिकारी बनत असल्याचा नवा इतिहास रचला गेला.
बीरदेव डोणे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या अथक कष्टांना, स्वतःच्या जिद्दील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. ते म्हणतात, स्वप्नं मोठी असावीत, परिस्थिती कितीही बिकट असली तरी विश्वास आणि प्रयत्न थांबवू नयेत.
आता बीरदेव डोणे यांचे ध्येय आहे, ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबाबत जागृती करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे. त्यांच्या यशामुळे अनेक युवकांना नवीन प्रेरणा मिळाली आहे. यमगे गावात बीरदेव डोणे यांच्या यशानंतर जल्लोषाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी ढोल-ताशांसह मिरवणूक काढली आणि त्यांच्या घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यांच्या आई-वडिलांचे डोळे अभिमानाने पाणावले होते.