माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे, लोकांचे प्रेम

Maharashtra WebNews
0


माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे भावोद्गार

कल्याण \ शंकर जाधव: माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम, आजच्या कृतज्ञता सोहळ्यास बहुसंख्येने नागरिक उपस्थित राहिले त्याचीच ही पावती आहे, असे भावोद्गार माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी शुक्रवारी काढले. डॉ.इंदु राणी जाखड यांची बदली पालघर जिल्हाधिकारी पदावर झाल्यानंतर, तसेच अभिनव गोयल यांची कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेच्या आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिरात माजी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा आणि नवनियुक्त महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बोलताना पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड त्यांनी हे उद्गार काढले.


PROJECT IMPLEMENTATION हे काम माझ्यासाठी नवीन होतं आणि ते करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. परंतु राजकीय प्रतिनिधींनी देखील पूर्ण पाठींबा दिला. महापालिका प्रशासक म्हणून काम करणे, ही फार मोठी संधी आहे. तसेच ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. परंतू, सर्वांच्या सहकार्याने मला चांगले काम करता आले, नागरिकांशी सुसंवाद साधता आला. या कामाची जबाबदारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल पार पाडतील, असेही त्या पुढे म्हणाल्या.


पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी उभारलेले फांऊडेशन माझ्यासाठी नक्कीच पथदर्शी असेल, विचारमंथन करुन सर्वांसोबत सुसंवाद साधून जास्तीत जास्त चांगले लोकोपयोगी काम करण्याचा मी प्रयत्न करेन, अशा शब्दात नवनियुक्त महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना आश्वासित केले.




माजी महापालिका आयुक्त यांच्या काळात २७ गावांतील अमृत योजनेच्या कामाला चांगली गती मिळाली, अशा शब्दात आमदार राजेश मोरे यांनी पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांची प्रशंसा केली. तर, डॉ.इंदु राणी जाखड यांनी आपल्या परिवाराप्रमाणे कल्याण-डोंबिवलीची काळजी घेतली. नवीन आयुक्तांनी देखील नागरिक केंद्रीत प्रशासनाचे काम करावे, असे उद्गार मा. आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भाषणात काढले.


यावेळी डॉ.नरेशचंद्र, डॉ.प्रशांत पाटील, प्रमोद हिंदुराव, माजी पदाधिकारी रवी पाटील, महेश पाटील, डॉ.इंदु राणी जाखड यांचे पती व श्वशुर तसेच इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. माजी आयुक्त यांच्या कालावधीत परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्याने परिवहन विभागाने डॉ.इंदु राणी जाखड यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. महापालिका अधिकारी वर कर्मचारी वर्गाच्या वतीने देखील त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिवहन उपक्रमातील लाभार्थी कर्मचाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरुपात निवृत्ती वेतन आदेश आणि धनादेश वितरीत करण्यात आले.


यावेळी आमदार राजेश मोरे, विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, माजी पदाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे पती मोहित गर्ग व इतर कुंटूंबीय, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-१ हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त-२ योगेश गोडसे, तसेच इतर अधिकारी वर्ग व्यासपिठावर उपस्थित होता. महापालिका अधिकारी व कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, नागरिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी केले.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)